मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत बुधवारच्या सत्रात रुपया ५२ पैशांनी घसरून ८७.४३ पातळीवर बंद झाला. १ ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी सुमारे २०-२५ टक्के आयात कर दराचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर भारत-अमेरिका व्यापार करारावरील अनिश्चिततेमुळे बुधवारी रुपया ५२ पैशांनी घसरला.
महिन्याच्या अखेरीस आयातदारांकडून डॉलरची मागणी आणि सतत परदेशी गुंतवणूक बाहेरचा रस्ता धरत असल्याचा स्थानिक चलनाच्या मूल्यावर नकारात्मक परिणाम दिसून आला, असे चलन व्यापाऱ्यांनी सांगितले. परकीय चलन बाजारात, डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८७.१० रुपये पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली आणि त्याने ८७.५० या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. मंगळवारी, रुपया चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरगुंडीसह डॉलरच्या तुलनेत २१ पैशांच्या नुकसानीसह ८६.९१ वर बंद झाला होता.
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरील अनिश्चिततेमुळे रुपया आणखी घसरण्याची अपेक्षा आहे. जागतिक स्तरावर तेलाच्या वाढत्या किमती आणि विदेशी गुंतवणुकीच्या पलायनामुळे रुपया अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिवाय, फेडरल रिझर्व्ह आणि बँक ऑफ जपानच्या पतधोरणाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. यामुळे येत्या काही सत्रात रुपया ८७ – ८७.९० च्या श्रेणीत व्यवहार करण्याची अपेक्षा आहे, असे मिरॅ ॲसेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी म्हणाले. भारतीय निर्यातीवरील अमेरिकेच्या वाढीव करामुळे रुपया चार महिन्यांच्या नीचांकी घसरल्याने त्याला आधार देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बॅकेकडून सोने खरेदी
जागतिक पातळीवरील वाढती अनिश्चितता लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने सोने खरेदी सुरू ठेवली आहे. सरलेल्या जून महिन्यात मध्यवर्ती बँकेबे अर्धा टन सोने खरेदी केली. सोन्याचे दर गेल्या पाच वर्षात ८० टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. मध्यवर्ती बँकेकडील सोन्याच्या साठ्यात वाढ होऊन तो २७ जूनअखेर ८७९.८ टनांवर पोहोचला आहे. त्या आधीच्या आठवड्यात ८७९.६ टनांची नोंद झाली होती. परिणामी या काळात ४ क्विंटलची खरेदी झाली आहे.