पीटीआय, नवी दिल्ली

जागतिक पतमानांकन संस्था ‘एस अँड पी ग्लोबल’ने तब्बल १८ वर्षांनंतर भारताचे पतमानांकन सुधारून घेण्याच्या निर्णयानंतर, शुक्रवारी देशातील दहा आघाडीच्या बँका, वित्तसंस्थांच्या पतमानांकनातही सुधारणा केली. मजबूत आर्थिक वाढ, दमदार वित्त पुरवठ्याच्या शक्यतांच्या जोरावर हे पाऊल टाकण्यात आले.

देशाच्या आर्थिक विकासाच्या गतीला अनुरूप वित्तीय संस्थांचीही दमदार वाटचाल सुरू राहणार आहे. देशांतर्गत संरचनात्मक बदल आणि बुडीत कर्जांच्या वसुलीसारख्या प्रणालीतील सुधारणांचा या वित्तसंस्थांना फायदा होईल, असे ‘एस अँड पी ग्लोबल’ने म्हटले आहे.

‘एस अँड पी ग्लोबल’ने शुक्रवारी स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक, युनियन बँक आणि इंडियन बँक या सात बँकांसह आणि बजाज फायनान्स, टाटा कॅपिटल आणि एल अँड टी फायनान्स या वित्तीय कंपन्यांच्या दीर्घकालीन सार्वभौम पतमानांकनांत वाढ केली आहे. भारतातील बँका पुढील १२ ते २४ महिन्यांत पुरेशी पत गुणवत्ता, चांगला नफा आणि भांडवलीकरणाचे प्रमाण योग्य राखतील, असे ‘एस अँड पी’ने म्हटले आहे. शिवाय प्रणालीतील पत जोखीम कमी झाली असल्याचे निरीक्षणही तिने नोंदविले.

‘एस अँड पी ग्लोबल’ने भारताचे सार्वभौम पतमानांकन स्थिर दृष्टिकोनासह (उणे) ‘-बीबीबी’वरून आता एक पायरी वर ‘बीबीबी’ सकारात्मक असे उंचावणारा निर्णय गुरुवारी जाहीर केला.

भारताची मजबूत आर्थिक मूलभूत तत्त्वे पुढील दोन-तीन वर्षांत विकासाच्या गतीला आधार देतील. नादारी आणि दिवाळखोरी संहितेमुळे (आयबीसी) झालेल्या सुधारणा बँका व वित्तीय संस्थांसाठी लाभदायी ठरल्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. गुरुवारी, एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी), पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, एनटीपीसी लिमिटेड आणि टाटा पॉवर कंपनी लिमिटेड यांचे पतमानांकन देखील ‘-बीबीबी’वरून आता एक पायरी वर ‘बीबीबी’ केले आहे. एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया (एक्झिम बँक) आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (आयआरएफसी) यांचे दीर्घकालीन मानांकन ‘बीबीबी-’वरून आता ‘बीबीबी’ केले आहे.

पतमानांकनांत सुधारणेमुळे या कंपन्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उसनवारी अथवा निधी उभारणी ही अधिक सुलभ आणि अल्पदरात करता येणार आहे. संभाव्य गुंतवणूकदारांना या कंपन्यांच्या सक्षमतेची हमी म्हणूनही या मानांकनांकडे पाहिले जाते.

शेअर बाजारात भाव वधारणार?

‘एस अँड पी ग्लोबल’ने स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक, युनियन बँक आणि इंडियन बँक या सात बँकांसह आणि बजाज फायनान्स, टाटा कॅपिटल आणि एल अँड टी फायनान्स या कंपन्यांच्या पतमानांकनांत वाढ केल्याने शेअर बाजारात भाव वधारण्याची शक्यता आहे.