पीटीआय, नवी दिल्ली
देशातील प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीत जून महिन्यात २.२ टक्के वाढ होऊन ती ३ लाख २७ हजारांवर पोहोचली आहे. याच वेळी दुचाकींच्या विक्रीत १.७ टक्के वाढ होऊन ती १३ लाख ३० हजारांवर पोहोचली आहे.
‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)’ या संघटनेने वाहन विक्रीबाबत जून महिन्यातील प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, यंदा एप्रिल ते जून तिमाहीत प्रवासी वाहनांची विक्री ९ लाख ९५ हजार ९७४ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत ही विक्री ९ लाख १० हजार ४९५ होती. त्यात यंदा ९ टक्के वाढ झाली आहे. जूनअखेर संपलेल्या तिमाहीत दुचाकींची एकूण विक्री ४१ लाख ४० हजार ९६४ आहे. मागील वर्षी या तिमाहीत झालेल्या ३७ लाख २४ हजार ५३३ विक्रीच्या तुलनेत ती यंदा ११ टक्के वाढली आहे.
मान्सूनच्या पावसाने देशाचा बहुतांश भाग व्यापलेला आहे. आगामी काळात पाऊस चांगला पडून महागाई कमी होण्याचा अंदाज आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग कायम राहणार असून, त्यातून वाहननिर्मिती क्षेत्रालाही गती मिळेल.- विनोद अगरवाल, अध्यक्ष, सियाम
GAURAV MUTHE