बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने गुरुवारी गीतांजली जेम्स लिमिटेडच्या शेअर्सच्या फसवणुकीशी संबंधितप्रकरणी फरार व्यावसायिक मेहुल चोक्सीला नोटीस पाठवून त्यांच्याकडून ५.३५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. ही रक्कम १५ दिवसांत न भरल्यास अटक करून मालमत्तांसह बँक खाती जप्त करण्याचा इशाराही सेबीने दिला आहे. सेबीने ठोठावलेला दंड न भरल्याने नियामकाने चोक्सीला ही नोटीस पाठवली आहे. नीरव मोदीचे मामा चोक्सी हे गीतांजली जेम्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. तसेच ते प्रवर्तक गटातही सामील होते. चोक्सी आणि नीरव या दोघांवर सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेची (PNB) १४,००० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

चोक्सीची अँटिग्वा आणि बारबुडा येथे असल्याची माहिती

पीएनबी घोटाळा समोर आल्यानंतर २०१८ च्या सुरुवातीला दोन्ही आरोपी परदेशात पळून गेले होते. चोक्सी अँटिग्वा आणि बारबुडा येथे उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे, तर नीरव मोदी ब्रिटिश तुरुंगात आहे.

हेही वाचाः क्रेडिट कार्ड पेमेंटबाबतचा नियम बदलला, तुमचा परदेश प्रवास आता महागणार

५.३५ कोटी रुपये १५ दिवसांत भरावे लागणार

सेबीने चोक्सीला नवीन नोटीस पाठवून १५ दिवसांत ५.३५ कोटी रुपये भरण्यास सांगितले. या रकमेत व्याज आणि वसुलीचा खर्च समाविष्ट असणार आहे. थकबाकी न भरल्यास सेबी चोक्सीची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करून आणि तिचा लिलाव करून थकबाकी वसूल करेल. याशिवाय चोक्सीची बँक खातीही ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात येणार आहे.

हेही वाचाः देशातील सर्वात मोठ्या ‘या’ बँकेला १६,६९४ कोटींचा निव्वळ नफा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोक्सीला ऑक्टोबर २०२२ मध्ये ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता

सेबीने ऑक्टोबर २०२२ मध्ये चोक्सीला गीतांजली जेम्सच्या शेअर्समध्ये बनावटगिरी केल्याप्रकरणी ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. याशिवाय नियामकाने त्याच्यावर १० वर्षांसाठी शेअर बाजारावर बंदी घातली होती. गीतांजली जेम्सच्या शेअर्समध्ये कथित हेराफेरीची चौकशी केल्यानंतर सेबीने मे २०२२ मध्ये चोक्सीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.