मुंबई : भांडवली बाजार नियामक ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)’ प्राथमिक बाजारातील प्रारंभिक समभाग विक्री अर्थात ‘आयपीओ’मधील गैरप्रकार आणि सदोष पद्धतीने ‘आयपीओ’साठी अर्ज करणाच्या पद्धतींचा छडा लावत आहे. सध्या यासंबंधी तीन प्रकरणांचा तपास सुरू असल्याचे ‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी ‘असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट बँकर्स ऑफ इंडिया’च्या अधिवेशनात शुक्रवारी सांगितले.
नवीन कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्री प्रक्रियेचे व्यवस्थापन हाती असणाऱ्या तीन मर्चंट बँकर्सकडून ‘आयपीओ’दरम्यान वारंवार भरणा कृत्रिमरीत्या फुगवला जातो असे भांडवली बाजार नियामकांना आढळून आले असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे सुस्पष्ट संकेत बुच यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>गुंतवणूकदारांसाठी ‘सीडीएसएल’च्या दोन नवीन सुविधा

बाजार नियामकांकडून, ‘मूल खाती’अर्थात निष्पाप त्रयस्थ व्यक्तीच्या कागदपत्रांचा वापर करून उघडल्या गेलेल्या बनावट खात्यातून ‘आयपीओ’साठी अर्ज केले जाण्याचे गैरप्रकार तपासले जात असून, त्या संबंधाने पुरेशी माहिती आणि सप्रमाण पुरावे देखील हाती असल्याचे बूच यांनी स्पष्ट केले.
सूक्ष्म, लघू आणि मध्यम श्रेणीतील अर्थात एसएमई कंपन्यांच्या सूचिबद्धतेसाठी वेगळा बाजारमंच आहे. शिवाय त्याची वैशिष्ट्ये मुख्य मंचावर सूचिबद्धता प्रक्रियेपेक्षा देखील वेगळी आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये म्हणून अधिक जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी या मंचावर विशेष तरतूद आहे. याआधी देखील ‘सेबी’ने एसएमई मंचावर सूचिबद्ध होणाऱ्या कंपन्यांच्या किमतीत होणारी गैरप्रकार आणि हेराफेरी रोखण्यासाठी त्यांच्यावर विशेष देखरेखीची तरतूद केली आहे.

हेही वाचा >>> आता टाटांच्या ‘या’ कंपनीत होणार नोकर कपात; ३ हजार जणांचे रोजगार जाणार

सध्या कंपनीच्या प्रवर्तकांकडून देखील विविध माध्यमातून ‘आयपीओ’साठी अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या गटाचा शोध घेतला जातो. त्या माध्यमातून देखील ‘आयपीओ’मध्ये हेराफेरी केली जात असल्याचे ‘सेबी’च्या निदर्शनास आले आहे. बुच यांनी काही गैरप्रकारांनी अर्ज कसे फेटाळले जातात यावरही प्रकाश टाकला. ‘आयपीओ’ अर्जदारांची संख्या फुगवत नेत वाढवणे आणि त्या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हा उद्देश साधला जातो. बऱ्याचदा हेतुपुरस्सर चुकीचे ‘पॅन’ क्रमांक टाकून किंवा काही प्रकरणांमध्ये समान ‘पॅन’ क्रमांक टाकून देखील अर्ज संख्या वाढवली जाते, असे ‘सेबी’चे निरीक्षण आहे.
बुच यांनी ‘आयपीओ’ बाजारातील या गैरप्रकारांमध्ये दोषी आढळणाऱ्यांचा नामोल्लेख टाळला आणि दोषींवर काय कारवाई केली जाईल याबाबत भाष्य करणे टाळले.

गुंतवणूकदारांपेक्षा ‘ट्रेडर’चा मंच : बूच यांची निरीक्षणे

० सुमारे ६८ टक्के बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदार (एनआयआय) किंवा उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती आणि ४३ टक्के किरकोळ गुंतवणूकदार समभाग सूचिबद्ध झाल्याच्या पहिल्या आठवड्यातच समभाग विकून मोकळे होतात.
० ‘आयपीओ’ बाजार हा मुख्यत: गुंतवणूकदारांपेक्षा ट्रेडरचा मंच बनला असल्याचे सध्याचे चित्र
० एका महिन्याच्या कालावधीवर नजर टाकल्यास, सुमारे ७६ टक्के एनआयआय आणि ५२ टक्के किरकोळ गुंतवणूकदार ‘फ्लिप ट्रेड’ म्हणजेच ‘आयपीओ’तून समभाग मिळाल्यावर सूचिबद्धतेच्या दिवशी अधिमूल्य मिळत असल्यास नफावसुली करतात
० गेल्यावर्षी नोव्हेंबर २०२३च्या शेवटच्या आठवड्यात केवळ पाच ‘आयपीओं’साठी सुमारे २.५ लाख कोटी रुपयांच्या बोली आल्या, अलीकडे आयपीओंना मिळणारा अभूतपूर्व प्रतिसादही बूच यांच्या लेखी शोचनीय

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi to act against 3 i bankers found inflating ipo subscriptions chairperson buch print eco news zws
First published on: 19-01-2024 at 23:32 IST