मुंबई: देशांतर्गत आघडीवर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारच्या सत्रात १ टक्क्यांनी घसरले. परदेशी गुंतवणुकीचा मर्यादित ओघ आणि वाढत्या भू-राजकीय अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी केलेल्या समभाग विक्रीमुळे बाजारातील घसरण वाढली. गुंतवणूकदारांनी मुख्यतः ऊर्जा, वित्त आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये केलेल्या समभाग विक्रीच्या माऱ्याने देशांतर्गत बाजार सलग तिसऱ्या सत्रात घसरले.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६३६.२४ अंशांनी घसरून ८०,७३७.५१ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ७९८.६६ अंश गमावत ८०,५७५.०९ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १७४.१० अंशांची घसरण झाली आणि तो २४,५४२.५० पातळीवर बंद झाला.
जागतिक पातळीवरील संमिश्र संकेत, भू-राजकीय प्रतिकूलता आणि डॉलरमुळे चलन बाजारातील अस्थिरता यामुळे देशांतर्गत भांडवली बाजार नकारात्मक स्थितीत राहिला. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची अपेक्षा असल्याने गुंतवणूकदारांनी गृहनिर्माण क्षेत्रातील समभाग वगळता सर्व क्षेत्रांमध्ये नफावसुलीला प्राधान्य दिले. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये मात्र खरेदी दिसून आली. मुख्यतः या क्षेत्रातील कंपन्यांची वाढती कमाई आणि वाजवी मूल्यांकनाला समभाग उपलब्ध असल्याने गुंतवणूकदारांकडून पसंती मिळत आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी, अदानी पोर्ट्सचा समभाग २.४२ टक्क्यांनी घसरला. त्यापाठोपाठ बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड, इटरनल, इंडसइंड बँक, मारुती, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग पिछाडीवर होते. तर महिंद्र अँड महिंद्र हा एकमेव समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाला. अदानी समूहातील सर्व ११ सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) २,५८९.४७ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.
एमआरएफ सर्वाधिक मोलाचा समभाग
गेल्या सहा महिन्यांत एलसीड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडच्या समभागाच्या किमतीत तीव्र घसरण दिसून आली आहे. त्यामुळे टायर उत्पादक एमआरएफ लिमिटेडच्या समभागाने एलसीड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडला मागे टाकत पुन्हा एकदा भारतातील सर्वात मोल असलेला समभाग म्हणून जागा मंगळवारी मिळविली. सत्रादरम्यान एमआरएफचा समभाग १.९० टक्क्यांचा घसरणीसह १,३७,८३४ रुपयांवर स्थिरावला. समभागाने दिवसभरातील सत्रात १,४१,९०० रुपयांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. तर दुसरीकडे एलसीड इन्व्हेस्टमेंटचा समभाग ०.४२ टक्क्यांच्या घसरणीसह १,२९,३०० रुपयांवर बंद झाला. गेल्यावर्षी म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२४ रोजी एलसीड इन्व्हेस्टमेंट्सचा समभाग २,३६,२५० रुपयांच्या विक्रमी किमतीवर पोहोचला होता.
सेंसेक्स ८०,७३७.५१ -६३६.२४ – ०.७८%
निफ्टी २४,५४२.५० -१७४.१० – ०.७०%
तेल ६४.८१ ०.२८%
डॉलर ८५.६० २१ पैसे