मुंबई : अमेरिकेतील महागाईच्या स्थिर आकडेवारीमुळे जगभरातील भांडवली बाजारांतील चैतन्याचे प्रतिबिंब म्हणून बुधवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३०४ अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,६०० पातळीच्या पुढे बंद झाला. धातू, वाहन आणि औषध कंपन्यांच्या समभागांमधील खरेदीमुळे निर्देशांकांना बळ मिळाले.
गुरुवारी सत्रअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३०४.३२ अंशांची वाढ झाली आणि तो ८०,५३९.९१ पातळीवर बंद झाला. दिवसभरात ४४८.१५ अंशांची कमाई करत, त्याने ८०,६८३.७४ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १३१.९५ अंशांनी वधारून २४,६१९.३५ पातळीवर बंद झाला.
मंगळवार जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, किरकोळ महागाई दर जुलैमध्ये ८ वर्षांच्या नीचांकी १.५५ टक्क्यांपर्यंत नरमला आहे. विश्लेषकांच्या मते, त्या परिणामी शेअर बाजारांमध्ये सकारात्मक कल दिसून आला. महागाई नरमल्याने वाहन विक्री आणि ग्राहकोपयोगी उपभोगाचे पुनरुज्जीवन होण्याची आशा निर्माण झाली. जागतिक स्तरावर, चीनवरील वाढीव आयात शुल्क लागू करण्याची मुदत अमेरिकेने पुन्हा पुढे ढकलल्यामुळे आणि तेलाच्या किमती नरमल्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण होते.
ट्रम्प यांच्या व्यापार करासंबंधी भूमिकेबद्दल अनिश्चितता आणि जागतिक जोखीम असूनही, देशांतर्गत अर्थव्यवस्थेची गतिशीलता गुंतवणूकदारांसाठी आश्वासक ठरली आहे. १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ट्रम्प-पुतिन बैठकीबाबतही भारताला उत्सुकता आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
सेन्सेक्समधील भारत इलेक्ट्रॉनिक्स, महिंद्र अँड महिंद्र, कोटक महिंद्र बँक, टाटा मोटर्स आणि पॉवर ग्रिड यांचे समभाग वधारले. तर अदानी पोर्ट्स, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट आणि टायटनच्या समभागात घसरण झाली.
सेन्सेक्स ८०,५३९.९१ ३०४.३२ ( ०.३८%)
निफ्टी २४,६१९.३५ १३१.९५ ( ०.५४%
तेल ६५.८८ -०.३६%
डॉलर ८७.४३ -२० पैसे