मुंबई: महागाईच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळाला असून, किरकोळ महागाई दर एप्रिलमध्ये ३.१६ टक्के असा सहा वर्षांच्या नीचांकी, तर घाऊक महागाई दर १३ महिन्यांच्या नीचांकी पोहोचल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण होते. महागाई नरमल्याने आगामी जूनच्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेला पुन्हा एकदा व्याजदर कपात करण्यास वाव आहे.अमेरिकेत एप्रिलमध्ये थंडावलेली महागाई आणि जागतिक व्यापार तणावात कमी झाल्याने एकंदर भांडवली बाजारातील सकारात्मकतेत भर घातली. बुधवारच्या अत्यंत अस्थिर सत्रात, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १८२.३४ अंशांनी वाढून ८१,३३०.५६ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ८१,६९१.८७ ही उच्चांकी आणि ८०,९१०.०३ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ८८.५५ अंशांची भर घातली आणि तो २४,६६६.९० वर बंद झाला.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी, टाटा स्टील, इटरनल, टेक महिंद्र, मारुती, महिंद्र अँड महिंद्र, इन्फोसिस, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि भारती एअरटेल हे तेजीचे लाभार्थी ठरले. तर एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, कोटक महिंद्र बँक, एनटीपीसी आणि पॉवर ग्रिडच्या समभागात घसरण झाली.आतापर्यंत चौथ्या तिमाहीच्या निकालांमध्ये कंपन्यांच्या कमाईतील सुधारणांमुळे आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्पन्न वाढीविषयी आशावाद निर्माण झाला आहे. पतविषयक अनुकूल धोरणे, बाह्य मागणीत वाढ, अनुकूल मान्सूनचा अंदाज आणि घसरणारे व्याजदर हे अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी अनुकूल घटक ठरण्याची शक्यता आहे.- विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड.
रुपया १० पैशांनी सावरला
मुंबई: अमेरिकी डॉलरच्या तुलनेत बुधवारच्या सत्रात रुपया १० पैशांनी सावरून ८५.२६ वर स्थिरावला. देशांतर्गत भांडवली बाजारातील तेजीचे वातावरण आणि सकारात्मक आर्थिक आकडेवारीमुळे रुपयाला आधार मिळाला. अमेरिकी चलनाचा कमकुवतता आणि व्यापार शुल्क तणाव कमी झाल्यामुळे डॉलरच्या तुलनेत इतर चलनांची मागणी वाढली आहे.परकीय चलन बाजारात, रुपयाचे सकारात्मक पाऊल पडले. दिवसभरातील सत्रात रुपयाने ८५.०५ चा उच्चांक तर ८५.५२ या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. अखेर १० पैशांनी वधारून ८५.२६ रुपये प्रति डॉलरवर तो बंद झाला. दरम्यान, सहा चलनांच्या तुलनेत डॉलरच्या ताकदीचे मोजमाप करणारा डॉलर निर्देशांक ०.६४ टक्क्यांनी घसरून १००.३५ वर व्यवहार करत होता.
सेन्सेक्स ८१,३३०.५६ १८२.३४ ( ०.२२%)
निफ्टी २४,६६६.९० ८८.५५ ( ०.३६%)
तेल ६५.८८ -१.१३
डॉलर ८५.२६ – १० पैसे