मुंबई : भांडवली बाजारातील एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेसारख्या ‘ब्लू-चिप’ समभागांमधील खरेदी आणि आशियाई बाजारांतील मजबूत कलामुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने ४०० अंशांची उसळी घेतली.दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४१०.१९ अंशांनी (०.५१ टक्के) वधारून ८१,५९६.६३ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ८३५.२ अंशांची वाढ नोंदवून ८२,०२१.६४ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. मात्र सेन्सेक्स ८२ हजारांची पातळी टिकवून ठेवण्यास अपयशी ठरला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १२९.५५ अंशांची (०.५२ टक्के) वाढ झाली आणि तो २४,८१३.४५ पातळीवर बंद झाला.
अमेरिकेचे वाढीव कर आणि जागतिक व्यापारातील अडथळ्यांचे नकारात्मक परिणाम हाताळण्यासाठी भारत चांगल्या स्थितीत आहे. कारण देशांतर्गत विकासाचे चालक आणि निर्यातीवरील कमी अवलंबित्वामुळे अर्थव्यवस्थेला आधार मिळाला आहे, असे जागतिक पतमानांकन कंपनी मूडीज रेटिंग्जने बुधवारी म्हटले आहे. देशांतर्गत आघाडीवर खासगी गुंतवणुकीत वाढ, उत्पादन क्षमतेत वाढ आणि पायाभूत सुविधांवर खर्च वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
बुधवारच्या सत्रात बाजारावर सकारात्मक प्रभाव दिसून आला; मात्र तरी गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा कायम आहे. भारत-अमेरिका व्यापार वाटाघाटींभोवती असलेल्या वाढत्या अनिश्चिततेमुळे नजीकच्या भविष्यात ‘सेल ऑन रॅली’ धोरणाचा अवलंब होण्याची शक्यता आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, सन फार्मा, टेक महिंद्र, बजाज फायनान्स, एनटीपीसी, नेस्ले, टाटा मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि महिंद्र अँड महिंद्र यांचे समभाग वधारले. तर इंडसइंड बँक, कोटक महिंद्र बँक, पॉवर ग्रिड आणि आयटीसीच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी पडत्या बाजारातही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) १०,०१६.१० कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.
सेन्सेक्स ८१,५९६.६३ ४१०.१९ ( ०.५१ टक्के)
निफ्टी २४,८१३.४५ १२९.५५ ( ०.५२ टक्के) वाढ झाली आणि तो २४,८१३.४५
तेल ६६.१६ १.१९
डॉलर ८५.५९ १ पैसा