मुंबई : अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हने नजीकच्या काळात व्याज दरवाढीबाबत नरमाईने घेत, अर्थव्यवस्थेला अनुकूल भूमिकेचे सूतोवाच केल्याने जगभरातील भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला झालेल्या फेडच्या बैठकीचे इतिवृत्त प्रसिद्ध झाले आणि त्यातून दिसून आलेल्या सकारात्मक संकेतांनी देशांतर्गत पातळीवरही किमया साधली आणि तेजीवाल्यांनी बाजाराचा ताबा घेत ‘सेन्सेक्स’ला ६२ हजारांपुढील ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर नेले.

माहिती तंत्रज्ञान, बँका तसेच वित्तीय सेवा आणि तेल कंपन्यांशी संबंधित समभागात गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने गुरुवारी दोन्ही प्रमुख निर्देशांक एक टक्क्यांहून अधिक वधारले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७६२.१० अंशांची कमाई करून, ६२,२७२.६८ ही नवीन सार्वकालिक उच्चांकी पातळीवर दिवसाच्या व्यवहाराला निरोप दिला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने ९०१.७५ अंशांची उच्चांकी उसळी घेत, ६२,४१२.३३ या शिखर पातळीपर्यंत मजल मारली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २१६.८५ अंशांची वाढ झाली आणि तो १८,४८४.१० पातळीवर स्थिरावला. निफ्टीने सत्रात १८,५२९.७० ही ५२ आठवडय़ातील नवीन उच्चांकी पातळी पातळी गाठली. अमेरिकी भांडवली बाजारात आलेली तेजी, रोख्यांवरील परताव्याचा घटता व्याजदर आणि जगभरातील चलनांच्या तुलनेत कमकुवत झालेल्या डॉलरने ‘सेन्सेक्स’ला चालना दिली. तसेच देशांतर्गत आघाडीवर अर्थव्यवस्थेच्या वाढीविषयी सकारात्मक आकडेवारी आणि भांडवली गुंतवणुकीतील स्थिर वाढ या दोन घटनांनी सेन्सेक्सला नवीन उच्चांकी पातळीवर पोहोचण्यास मदत केली. 

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर

अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या पतधोरण समितीने व्याजदरातील वाढीचे चक्र मंदावण्याच्या दिलेल्या संकेतामुळे गुंतवणूकदारांनी बाजारात चौफेर समभाग खरेदी केली. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमतीतील घसरण आणि डॉलर निर्देशांक घसरल्याने निर्देशांक वाढीला मोठी झेप घेण्याचे बळ मिळवून दिले. रशियातून आयात होणाऱ्या खनिज तेलावरील संभाव्य किंमत मर्यादा आणि अमेरिकी तेल साठय़ात वाढ झाल्यामुळे खनिज तेलाच्या किमती नरमल्या, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले. सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस, विप्रो, पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस, हिंदूस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले. दुसरीकडे बजाज फिनसव्‍‌र्ह, टाटा स्टील, बजाज फायनान्स आणि कोटक महिंद्रा बँकेच्या समभागात मात्र घसरण झाली.

रुपया ३० पैशांनी मजबूत

भांडवली बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांचे मनोबल उंचावल्याने त्याचे सकारात्मक पडसाद चलन बाजारात रुपयाच्या मूल्यावरही उमटले. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारच्या सत्रात ३० पैशांनी मजबूत बनत ८१.६३ पातळीवर स्थिरावला. अमेरिकी अर्थव्यवस्थेची निगडित कमकुवत आकडेवारी आणि फेडच्या व्याज दरवाढीबाबत मवाळ भूमिकेने डॉलरला जगभरातील चलनांच्या तुलनेत कमकुवत केले. परकीय चलन विनिमय मंचावर रुपयाने ८१.७२ या पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. दिवसभरातील सत्रात रुपयाने ८१.६० या उच्चांकी पातळीला स्पर्श केला, तर ८१.७७ ही त्याची दिवसातील नीचांक पातळी राहिली.

६२,४१२.३३ २ ‘सेन्सेक्स’चे नवीन शिखरस्थान

१,१६७,  २ तीन सत्रांतील ‘सेन्सेक्स’ची कमाई