मुंबई : माहिती-तंत्रज्ञान (आयटी) आणि बँकिंग समभागांमधील विक्रीचा मारा आणि अमेरिका-भारत व्यापार चर्चेच्या निकालापूर्वी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याच्या परिणामी गुरुवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण झाली.सत्राअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३७५.२४ अंशांची घसरण झाली आणि तो ८२,२५९.२४ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ४१५.२१ अंश गमावत ८२,२१९.२७ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १००.६० अंशांनी घसरून २५,१११.४५ पातळीवर बंद झाला.
देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी विशेषतः माहिती-तंत्रज्ञान आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्याच्या मंदावलेल्या तिमाहीतील उत्पन्नामुळे सावधगिरी बाळगली. लार्ज-कॅप कंपन्यांच्या समभागांचे वाढलेले मूल्यांकन आणि अमेरिका-भारत व्यापार कराराच्या अनिश्चिततेमुळे परदेशी गुंतवणूकदारांची सुरू असलेली माघार यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनाही साशंक बनल्या आहेत. तथापि कोणत्याही सकारात्मक घडामोडीतून बाजारात पुन्हा चैतन्य निर्माण होण्याची आशा आहे, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
टेक कंपन्यांना फटका
परदेशी निधी निर्गमनामुळे आणि कंपन्यांच्या सरलेल्या जून तिमाहीतील कमाईत घट झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर नकारात्मक परिणाम झाला आहे, असे बाजार विश्लेषकांनी सांगितले. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये माहिती-तंत्रज्ञान समभागांना सर्वाधिक फटका बसला. टेक महिंद्राच्या समभागात ३ टक्क्यांची घसरण झाली. त्यापाठोपाठ इन्फोसिस, एचसीएल टेक, इटर्नल, लार्सन अँड टुब्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि ॲक्सिस बँक यांचे समभाग घसरले. मात्र, टाटा स्टील, ट्रेंट, टायटन आणि टाटा मोटर्सचे समभाग सकारात्मक पातळीवर स्थिरावले.
सेन्सेक्स ८२,२५९.२४ -३७५.२४ (-०.४५%)
निफ्टी २५,१११.४५ -१००.६० (-०.४०%)
तेल ६८.४९ – ०.०६%
डॉलर ८६.०७ १५ पैसे