अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या अव्वाच्या सव्वा टॅरिफचे आर्थिक दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. एकीकडे मुंबईकर लाडक्या गणरायाच्या आगमनात व्यग्र असताना दुसरीकडे ट्रम्प यांचं अन्यायकारक टॅरिफ त्याच दिवसापासून म्हणजेच २७ ऑगस्टपासून देशभरात लागू झालं. टॅरिफ लागू झाल्यानंतर आज मुंबई शेअर बाजार सुरू होताच या टॅरिफ अस्त्राचा पहिला घाव थेट गुंतवणूकदारांच्या खिशावर बसला. Sensex आणि Nifty50 हे मुंबई शेअर बाजारातील महत्त्वाचे निर्देशांक नुकसानीच्या आकड्यांमुळे लाल झाले होते. त्यामुळे टॅरिफ लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे तब्बल ४ लाख कोटी पाण्यात गेले!
Sensex च्या गटांगळ्या!
डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ लागू झाल्यानंतर त्याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार पहिल्याच दिवशी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स ७०० अंकांनी कोसळला. हे प्रमाण जवळपास १ टक्का होतं. त्यामुळे इंट्राडे व्यवहारांत सेन्सेक्स ८०,०९३.५२ इतक्या नीचांकावर गेला. पुढच्या तासाभरात सेन्सेक्सनं काही अंशी भरपाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सकाळच्या पहिल्या सत्रात सुरुवातीलाच बसलेल्या झटक्यातून सेन्सेक्स सावरू शकला नाही.
Nifty 50 चीही पडझड
दरम्यान, एकीकडे सेन्सेक्स कोसळला असताना दुसरीकडे निफ्टी ५०चीही पडझड पाहायला मिळाली. सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीही १ टक्क्यांनी घसरला. निफ्टीनं सकाळच्या पहिल्या सत्रात २४,५०७.२० हा नीचांक गाठल्यामुळे गुंतवणूकदार हवालदील झाल्याचं पाहायला मिळालं.
४ लाख कोटींचं नुकसान!
Sensex आणि Nifty50 ची पडझड गुंतवणूकदारांसाठी दु:स्वप्न ठरली. पहिल्या सत्रातल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल ४ लाख कोटी पाण्यात गेले. मुंबई शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांची मिळून एकूण संपत्ती ४४९ लाख कोटींवरून थेट ४४५ लाख कोटींपर्यंत खाली आली.
Tariff तर आहेच, पण दुसरी काय कारणं?
मुंबई शेअर बाजारात दिसणाऱ्या घसरणीमागे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा परिणाम हे महत्त्वाचे कारण सध्या अधोरेखित होत आहे. पण त्यासोबतच इतरही काही घटक या घसरणीसाठी कारणीभूत मानले जातात. त्यात FII अर्थात Foreign Institutional Investors कडून सातत्याने त्यांच्याकडच्या शेअर्सची विक्री होत असल्याची बाब सांगितली जात आहे. रुपयाच्या तुलनेत स्थिर असणाऱ्या डॉलरमुळे हे होत असल्याचा दावा केला जात आहे. FII नं फक्त ऑगस्ट महिन्यात तब्बल ३४ हजार ७३३ कोटी रुपये किमतीच्या शेअर्सची विक्री केली आहे. जुलैमध्ये हा आकडा थेट ४७ हजार ६६७ कोटी इतका होता!