मुंबई : चीनवरील व्यापार कराची अंमलबजावणी आणखी ९० दिवस लांबणीवर टाकण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाने जगभरातील बाजारात दिलासादायी तेजी सुरू असताना, मंगळवारी स्थानिक बाजारात घसरणीने सेन्सेक्स आणि निफ्टी नकारात्मक पातळीवर स्थिरावले. सोमवारी दिसलेली तेजीवाल्यांची सक्रियता अल्पजीवी ठरली आणि ब्लू-चिप बँक शेअरमधील विक्रीने घसरणीला हातभार लावला.
अत्यंत अस्थिर सत्राच्या अखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३६८.४९ अंशांची घसरण झाली आणि तो ८०,२३५.५९ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ८०,९९७.६७ अंशांची उच्चांकी आणि ८०,१६४.३६ अंशांची नीचांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ९७.६५ अंशांची घसरण झाली आणि तो २४,४८७.४० पातळीवर बंद झाला. येत्या १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ट्रम्प-पुतिन चर्चेतून आशादायी फलिताचीही गुंतवणूकदार उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, बजाज फायनान्स, ट्रेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर मारुती, टेक महिंद्र, महिंद्र अँड महिंद्र आणि एनटीपीसी यांचे समभाग वधारले. सोमवारच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) १,२०२.६५ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.
आजच्या घसरणीमागील सहा प्रमुख कारणे
१) ट्रम्प-पुतिन भेटीपूर्वी सावधगिरी : १५ ऑगस्ट रोजी अलास्का येथे होणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील नियोजित बैठकीपूर्वी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे आढळून आले. विश्लेषकांच्या मते, अमेरिका-चीन व्यापार युद्ध ९० दिवस लांबणीवर पडल्यामुळे आयटी समभागांना बळ मिळाले असले तरी, यातून व्यापक तेजी अपेक्षित नाही. कारण बाजाराने ज्या मुख्य घटनेवर लक्ष केंद्रित केले आहे, ते म्हणजे ट्रम्प-पुतिन यांची भेट आणि त्यातून रशिया-युक्रेन युद्धविरामाच्या परिणाम दिसेल काय, असे आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख पंकज पांडे यांनी सांगितले.
२) गुंतवणूकदार भारत तसेच अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीची वाट पाहत आहेत. अमेरिकेतील आकडेवारी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या कृतीला दिशा देईल अशी अपेक्षा आहे. बाजार बंद झाल्यानंतर जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, खाद्यान्नांच्या किमती कमी झाल्यामुळे भारतातील महागाई आठ वर्षांच्या नीचांकी १.५५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.
३) एफआयआय विक्री : अधेमधे अपवादात्मक खरेदी होत असली तरी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी अविरत विक्री सुरू ठेवली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, सोमवारी त्यांनी १,२०२.६५ कोटी रुपयांचे समभाग विकले.
४) खनिज तेलाच्या वाढत्या किमती : ब्रेंट क्रूड फ्युचर्सचे दर ०.३३ टक्क्यांनी वाढून पिंपामागे ६६.८५ डॉलरवर पोहोचले, ज्यामुळे भारताच्या आयात खर्चात वाढ आणि महागाईच्या गतीबद्दल चिंता निर्माण झाली.
५) इंडिया ‘व्हीआयएक्स’मध्ये वाढ : भांडवली बाजारातील अस्थिरतेचे मोजमाप करणारा ‘इंडिया व्हीआयएक्स’ १ टक्क्यांहून अधिक वाढून १२.३५ वर पोहोचला. या निर्देशांकाचा पारा गुंतवणूकदारांच्या चिंता वाढविणारा ठरला.
६) कमकुवत जागतिक संकेत : युरोपीय बाजारांमध्ये सकारात्मकता असली, तरी दक्षिण कोरियाच्या कोस्पी आणि हाँगकाँगच्या हँग सेंगसह प्रमुख आशियाई बाजारपेठांमध्ये नरमाईची स्थिती होती. काल म्हणजेच सोमवारी अमेरिकी बाजारपेठाही घसरणीच्या स्थितीत बंद झाल्या.
सेन्सेक्स ८०,२३५.५९ -३६८.४९ (-०.४६%)
निफ्टी २४,४८७.४० -९७.६५ (-०.४०%)
तेल ६६.७५ ०.१८
डॉलर ८७.७२ -३ पैसे