मुंबई: ज्याची भीती होती ते ५० टक्के ट्रम्प टॅरीफ अवघ्या काही तासांत भारतावर लागू होत असून, आज २६ ऑगस्टला शेअर बाजारात याचे जबर धसक्याचे परिणाम दिसून आले. अमेरिकेतील अन्य घडामोडींचेही संपूर्ण जगभरातील बाजारात नकारात्मक पडसाद उमटले. सेन्सेक्स ८४९ अंशांनी गडगडला, तर निफ्टीने २४,८०० च्या पातळीखाली बुडी घेतली. दोन्ही निर्देशांकांत मंगळवारी सकाळी बाजार खुला झाल्यापासून घसरणीचा क्रम सुरूच होता.

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून झालेल्या मोठ्या प्रमाणात विक्री, त्याचा परिणाम म्हणून डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरगुंडी या घटकांनी गुंतवणूकदारांच्या भावना प्रचंड नकारात्मक बनविल्या. ऑगस्टमध्ये आतापर्यंत सेन्सेक्स-निफ्टीने कमावलेले, गेल्या काही सत्रांतील घसरणीतून गमावल्याची स्थिती आहे. मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्समधील ३० पैकी २४ समभाग जबर नुकसानीसह बंद झाले. यात रिलायन्स इंडस्ट्रीज ज‌वळपास २ टक्क्यांनी, तर आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एल अँड टी, भारती एअरटेल हे शेअर्स प्रत्येकी १ टक्क्यांनी गडगडले. १६ क्षेत्रीय निर्देशांपैकी, १५ निर्देशांकांचे व्यवहार हे घसरणीसह सुरू होते. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप निर्देशांकातही १ टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली.

बाजारातील मोठ्या झडीची प्रमुख कारणे

ट्रम्पचे ५० टक्के टॅरिफ

ट्रम्प प्रशासनाच्या धक्कादायक निर्णयाने बाजार भावना प्रचंड नकारात्मक बनविल्या. अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटीच्या अधिसूचनेत बुधवारपासून सर्व भारतीय वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के कर लादला जाणार असल्याचे स्पष्ट झाले. अर्थात आधी घोषित केलेल्या २५ टक्क्यांमध्ये ही नव्याने भर पडून, भारताच्या निर्यातीवर ५० टक्के कर लागू होईल. हा डबल टॅरिफ ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे रशियन खनिज तेलाच्या खरेदीबद्दल असून, त्यातून आता आपल्या अमेरिकेशी व्यापाराला जबर फटका बसणे अपरिहार्य दिसत आहे.

नफावसुुली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्याप्रमाणे, अनेक वस्तू व सेवांच्या किमती कमी करणाऱ्या जीएसटी सुधारणांच्या घोषणेमुळे शेेअर बाजारातील तेजी गेल्या काही दिवसांत दिसून आली. विशेषत: या परिणामी भाव वधारलेल्या शेअर विकून नफा पदरी बांधून घेण्याची संधी गुंतवणूकदारांनी साधल्याचे दिसून आले.

विदेशी गुंतवणूकदारांची विक्री

स्थानिक बाजारातून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) पाठ फिरविण्याचा क्रम निरंतर सुरू आहे. चालू ऑगस्ट महिन्यांत त्यांनी पुन्हा काही खरेदी केली असली तरी त्यांची नक्त विक्री ही सुमारे २१ हजार कोटींच्या घरात जाणारी आहे. जुलैमध्ये तर त्यांनी १.२० लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. २५ ऑगस्टला एफआयआयकडून २,४६६ कोटी रुपये मूल्याची शेअर विक्री झाली होती.

कमकुवत रुपया

मंगळवारी चलन बाजारात रुपयाच्या मूल्याचा पाळापोचाळा होताना दिसून आला. ताज्या वृत्तानुसार, रुपया काहीसा सावरला, तरी २२ पैशांच्या नुकसानीसह, डॉलरमागे ८७.७८ या पातळीवर त्यात व्यवहार सुरू होते.

जागतिक बाजारातील कमजोरी

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तेथील मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हमधील वितुष्ट वाढत आहे. ट्रम्प प्रशासनाच्या हस्तक्षेप वाढत असून, त्यातून जगातील सर्वात महत्त्वाच्या मध्यवर्ती बँकेचे स्वातंत्र्य व स्वायत्ततेला धोका निर्माण झाला आहे. याचे भारतातच नव्हे, लंडन शेअर बाजार, युरोपीय बाजार, आशियाई बाजारांत धक्कादायी पडसाद उमटले.