नवी दिल्ली : वाढीव आयात कराचे धोके आणि जागतिक विकासातील मंदी या घटकांची भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या शक्यतांवर छाया असली तरी, देशांतर्गत मागणीने पुरविलेली ताकद आणि जोमदार कृषी क्षेत्र, आर्थिक सुधारणांचा ध्यास ही भारताच्या अर्थव्यवस्थेची बलस्थाने आहेत. उल्लेखनीय म्हणजे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलिकडच्या ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हणून हेटाळणीला उत्तर ठरेल असे हे कोडकौतुक हे न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय असलेल्या जागतिक पतमानांकन संस्थेने केले आहे.
मजबूत आर्थिक वाढ, दमदार वित्तपुरवठ्याच्या जोरावर जागतिक पतमानांकन संस्था ‘एस अँड पी ग्लोबल’ने तब्बल १८ वर्षांनंतर भारताचे पतमानांकन सुधारून घेतले आहे. देशाचे सार्वभौम पतमानांकन स्थिर दृष्टिकोनासह (उणे) ‘-बीबीबी’वरून आता एक पायरी वर ‘बीबीबी’ असे गुरुवारी उंचावण्यात आले.
महागाई रोखण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेशी अनुकूल राखलेल्या पतधोरणाचा ‘एस अँड पी’ने आवर्जून उल्लेख केला आहे. भारत जगातील सर्वोत्तम कामगिरी करणारी आणि वेगवान अर्थव्यवस्था आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत सरकारी खर्चाची गुणवत्ता सुधारली आहे, असे गौरवपर निरीक्षणही तिने नोंदवले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात ‘एस अँड पी’ने भारताचा दृष्टीकोन ‘स्थिर’वरून ‘सकारात्मक’ असा बदलला आणि पुढील २४ महिन्यांत मानांकनात सुधारणा होण्याचे संकेत दिले होते. पण त्यापूर्वीच मानांकन सुधारून घेतले आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेवर अमेरिकेच्या वाढीव आयात शुल्काचा परिणाम मर्यादित राहणार असून त्याबाबत योग्य ते व्यवस्थापन करता येईल, असे ‘एस अँड पी’ने म्हटले आहे. तसेच अमेरिकी निर्यातीवर ५० टक्के शुल्क (लागू केल्यास) वाढीवर भौतिक ताण येणार नाही. भारत परदेशी व्यापारावर तुलनेने कमी अवलंबून आहे आणि त्याच्या आर्थिक वाढीच्या सुमारे ६० टक्के वाढ देशांतर्गत वापरातून येते, असे त्यात म्हटले आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला ‘मृत अर्थव्यवस्था’ संबोधल्यानंतर काही दिवसांतच हे मानांकनात सुधारणेचे उत्साहादायी वृत्त आले आहे.
परिणाम काय?
‘एस अँड पी’ने मानांकनात सुधारणा केल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कंपन्यांचा उसनवारीचा खर्च कमी होण्यास मदत होईल. जानेवारी २००७ पासून ‘एस अँड पी’ने भारताला ‘बीबीबी-’ या सर्वात कमी गुंतवणूक श्रेणीवर ठेवले होते. आता त्यात एक पायरी वर नेणारी सुधारणा करण्यात आली आहे. हे सार्वभौम मानांकन देशाची कर्ज परतफेडीचे दायीत्व व्यवस्थित पार पाडण्याची सुधारित क्षमता दर्शविते.
‘एस अँड पी’ने भारताचे दीर्घकालीन सार्वभौम मानांकन ‘बीबीबी-’ वरून ‘बीबीबी’ आणि अल्पकालीन मानांकन ‘ए-३’वरून ‘ए-२’ असे केले आहे.
अर्थतज्ज्ञांचे म्हणणे काय?
० मानांकन सुधारले ही निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. मात्र हे खूप उशीराने घडून आले आणि खूप थोडकेचही आहे. वास्तविक भारताची आर्थिक आणि वित्तीय गतिमानता ही कथित पत जोखमी मूल्यांकनापेक्षा खूप अधिक सरस आहे, हे पतमानांकन संस्थांनीही मान्य केले आहे. – सुजान हाजरा, मुख्य अर्थतज्ज्ञ, आनंद राठी समूह
० बँकांकडे कमी होत असलेली कर्ज मागणीला यातून चालना मिळेल. देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या बळकटीची ही हमी असून, दीर्घकालीन रणनीतिक आणि धोरणात्मक भांडवल प्रवाह यातून बळावू शकतो. – ऐश्वर्य दधीच, मुख्य गुंतवणूक अधिकारी, फायडेंट ॲसेट मॅनेजमेंट