पीटीआय, नवी दिल्ली
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेला चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १९,१६० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे.
बँकेने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १७,०३५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. जून २०२५-२६ च्या तिमाहीत एकूण उत्पन्न १,३५,३४२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षी १,२२,६८८ कोटी रुपयांवरून होते, असे स्टेट बँकेने बाजारमंचांना कळवले आहे. बँकेने मिळवलेले व्याज १,१७,९९६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे आर्थिक वर्ष २०२५ च्या जून तिमाहीत १,११,५२६ कोटी रुपये होते. कार्यचालन नफा देखील २६,४४९ कोटी रुपयांवरून ३०,५४४ कोटी रुपये झाला आहे.
मालमत्ता गुणवत्तेच्या आघाडीवर बँकेने चांगली कामगिरी केली आहे. जून तिमाहीच्या अखेरीस एकूण अनुत्पादित मालमत्तांमध्ये (एनपीए) १.८३ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. जी गेल्या वर्षी २.२१ टक्के होती. त्याचप्रमाणे, निव्वळ बुडीत कर्जे ०.५७ टक्क्यांवरून ०.४७ टक्क्यांपर्यंत घसरली. मात्र पहिल्या तिमाहीत ४,७५९ कोटी रुपयांच्या तरतुदी आणि आकस्मिकता निधी राखीव ठेवण्यात आला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत ३,४४९ कोटी रुपये राहिला होता.
बँकेचा भांडवली पर्याप्तता गुणोत्तर १४.६३ टक्क्यांपर्यंत सुधारला, जो आर्थिक वर्ष २५ च्या याच तिमाहीत १३.८६ टक्के होता. एकत्रित आधारावर, स्टेट बँक समूहाचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या १९,६८१ कोटी रुपयांवरून २१,६२७ कोटी रुपयांवर पोहोचला, जो मागील वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढला. एकूण उत्पन्नही १,५२,१२५ कोटी रुपयांवरून १,६६,९९२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
शुक्रवारच्या सत्रात स्टेट बँकेचा शेअर ८०५.१० रुपयांवर व्यवहार करत आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, बँकेचे ७,४३,१५७ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.