Share Market update news मुंबई : विद्यमान महिन्याच्या अखेरीस अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या आशेने जागतिक भांडवली बाजारांमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे. सोमवारच्या सत्रात तेजीवाल्यांनी बाजाराचा ताबा घेत आशावाद काम ठेवला आहे. मात्र सत्राच्या अखेरच्या तासात नफावसुली झाल्याने सेन्सेक्स ८१,१७१ या सत्रातील उच्चांकी पातळीपासून माघारी फिरला.

सोमवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७६.५४ अंशांनी वधारून ८०,७८७.३० पातळीवर स्थिरावला. सत्रात त्याने ४६०.६२ अंशांची कमाई करत ८१,१७१.३८ ही उच्चांकी पातळी गाठली. वाहन निर्मिती, तेल आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये वाढ झाली. तर, माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याने तेजी मर्यादित राहिली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३२.१५ अंशाची वाढ झाली आणि तो २४,७७३.१५ पातळीवर बंद झाला.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, टाटा मोटर्सचे समभाग ३.९७ टक्क्यांनी वधारले. त्यापाठोपाठ महिंद्र अँड महिंद्र, मारुती, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स आणि अल्ट्राटेक सिमेंट हे तेजीसह स्थिरावले. मात्र ट्रेंट, एशियन पेंट्स, एचसीएल टेक, टेक महिंद्र, लार्सन अँड टुब्रो, टीसीएस, पॉवर ग्रिड आणि सन फार्मा यांची कामगिरी निराशाजनक राहिली.

‘बाय-ऑन-डीप्स, सेल-ऑन-रॅलीज’ म्हणजेच बाजार घसरणीत खरेदी आणि तेजीत विक्री या सूत्राचा अवलंब करत गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा पवित्रा घेतला. जीएसटी दरकपातीनंतर मागणी पुनर्प्राप्तीच्या अपेक्षेने वाहन निर्मिती आणि त्यासंबंधित क्षेत्रांमध्ये तेजी दिसून आली, तर जागतिक अनिश्चिततेमुळे माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला झळ बसली. विद्यमान महिन्यात फेडकडून दरकपातीची आशा निर्माण करणाऱ्या अमेरिकी रोजगारीच्या आकडेवारीमुळे जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरण आहे, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

भारतीय शेअर बाजारांनी सोमवारच्या सत्रात तेजी दाखवली, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही सकारात्मक क्षेत्रात बंद झाले, प्रामुख्याने ऑटो, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समधील जोरदार खरेदीमुळे बाजार तेजीत होता.  तेजीचे मुख्य कारण म्हणजे देशांतर्गत वाढीबद्दल आशावाद, मागणीत सुधारणेच्या आशेने वाहन कंपन्यांचे समभाग तेजीत होते. परिणामी निफ्टी ऑटो निर्देशांक ३.३० टक्क्यांनी वधारला, असे निरीक्षण  बोनान्झाचे संशोधन विश्लेषक वैभव विद्वानी यांनी नोंदवले.