मुंबई: माहिती-तंत्रज्ञान, वाहन निर्मिती आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये शुक्रवारी ६९० अंशांची घसरण झाली. जागतिक पातळीवर अमेरिकेच्या व्यापार शुल्क धोरणासंबंधित अनिश्चिततेमुळेही निर्देशांकातील घसरण मालिका सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिली.
सत्राअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६८९.८१ अंशांनी घसरून ८२,५००.४७ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ७४८.०३ अंश गमावत ८२,४४२.२५ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २०५.४० अंशांची घसरण झाली आणि तो २५,१४९.८५ पातळीवर बंद झाला.
कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीशीसंबंधित तिमाहीच्या हंगामाची सुरुवात निराशाजनक झाल्याने आणि कॅनडावर ३५ टक्के कर लादण्याच्या अमेरिकेच्या धमकीमुळे देशांतर्गत भांडवली बाजारात घसरण वाढली. गुंतवणूकदार मंदीत खरेदी म्हणजेही ‘बाय-ऑन-डिप्स’ धोरणानुसार कंपन्यांच्या तिमाही उत्पन्नावर लक्ष केंद्रित करत आहेत. तथापि, नजीकच्या काळात, सध्याचे वाढलेले मूल्यांकन, खर्चासाठी कंपन्यांचा आखडता हात आणि अमेरिकेच्या धोरण अनिश्चिततेसारख्या जागतिक अडचणींमुळे नवीन गुंतवणूक आकर्षित होण्यास अडसर आहे. कार्यादेशातील विलंब आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या असमाधानकारक तिमाही कामगिरीमुळे बाजारात घसरण सुरू आहे, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसची सरलेल्या जून तिमाहीतील आर्थिक कामगिरी निराशाजनक राहिल्याने तिचा समभाग ३.४६ टक्क्यांनी घसरला. त्यापाठोपाठ महिंद्र अँड महिंद्र, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, टायटन, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, ट्रेंट, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँकेचे समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले. दुसरीकडे येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून प्रिया नायर या कंपनीच्या पहिल्या महिला मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक हिंदुस्तान युनिलिव्हरचा (एचयूएल) कारभार हाती घेणार असल्याने कंपनीचा समभाग ४.६१ टक्क्यांनी वधारला. तसेच ॲक्सिस बँक, एनटीपीसी आणि स्टेट बँकेच्या समभागांची कामगिरी चमकदार राहिली.
सेन्सेक्स ८२,५००.४७ -६८९.८१ (-०.८३%)
निफ्टी २५,१४९.८५ -२०५.४० (-०.८१%)
तेल ६८.८५ ०.३१%
डॉलर ८५.७७ ७