पीटीआय, नवी दिल्ली
Tata Motors Vehicle Prices Updates : देशातील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) कपातीचा संपूर्ण फायदा ग्राहकांना देण्यासाठी प्रवासी वाहनांच्या किमती कमी करण्याची शुक्रवारी घोषणा केली आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून विविध श्रेणीतील प्रवासी वाहनांच्या किमती ६५,००० ते १.४५ लाख रुपयांपर्यंत कमी करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
लहान प्रवासी वाहन श्रेणीतील टियागोच्या किमतीत ७५,००० रुपये, टिगोरच्या ८०,००० रुपये आणि अल्ट्रोझच्या किमतीत १.१० लाख रुपयांची कपात करण्यात येणार आहे. तसेच, कॉम्पॅक्ट एसयूव्ही पंचच्या किमतीत ८५,००० रुपये आणि नेक्सॉनच्या किमतीत १.५५ लाख रुपयांची कपात होईल. मध्यम आकाराच्या कर्व्हच्या किमतीतही ६५,००० रुपयांची कपात होईल, असे टाटा मोटर्सने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कंपनीच्या प्रीमियम एसयूव्ही – हॅरियर आणि सफारीच्या किमती अनुक्रमे १.४ लाख आणि १.४५ लाख रुपयांनी कमी होतील, असे त्यात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दृष्टिकोनानुसार ग्राहक प्रथम या तत्वज्ञानाला अनुसरून टाटा मोटर्सने जीएसटी कपातीचा संपूर्ण लाभ ग्राहकांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे, टाटा मोटर्स प्रवासी वाहन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा म्हणाले. येत्या २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणारा प्रवासी वाहनांवरील जीएसटीमध्ये कपातीचा निर्णय धाडसी आणि वाहन उद्योगाला गती देणारा आहे. यामुळे लाखो भारतीयांचे वैयक्तिक वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल, असे त्यांनी नमूद केले.
टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या किमती कमी केल्यामुळे आता प्रतिस्पर्धी वाहन कंपन्यांकडून देखील वाहनांच्या किमतीमध्ये मोठ्या कपातीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विद्यमान आठवड्याच्या सुरुवातीला जीएसटी परिषदेने २२ सप्टेंबर, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ५ टक्के आणि १८ टक्के अशा दोन स्तरीय जीएसटी दररचनेला मंजुरी दिली.
कोणते वाहन किती स्वस्त होणार?
वाहन कपात किंमत (रुपयांमध्ये)
टाटा टियागो ७५,००० ४,९९,९९०
टाटा टिगोर ८०,००० ५,९९,९९०
टाटा अल्ट्रोज १.१० लाख ६,८९,०००
टाटा पंच ८५,००० ६,१९,९९०
टाटा नेक्सॉन १.५५ लाख ७,९९,९९०
टाटा कर्व्ह ६५,००० ९,९९,९९०
टाटा हॅरियर १.४ लाख १४,९९,९९०
टाटा सफारी १.४५ लाख १५,४९,९९०