मुंबईः टाटा सन्सच्या अध्यक्षपदी एन. चंद्रशेखरन हेच कायम राहणार असून, या पदावरील त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळास टाटा ट्रस्टने मंजुरी दिल्याचे समजते. टाटा समूहात निवृत्तीची ६५ वर्षांची वयोमर्यादा असतानाही चंद्रशेखरन यांची निवड करण्यात आली आहे.

काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा चंद्रशेखरन यांचा दुसरा कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ मध्ये संपत आहे. त्यावेळी ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील. टाटा समूहाच्या निवृत्तीच्या धोरणानुसार, वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्याने ६५ व्या वर्षी निवृत्त होणे अपेक्षित आहे. याचवेळी बिगर कार्यकारी भूमिकेतील अधिकाऱ्यासाठी ही वयोमर्यादा ७० वर्षे आहे. मात्र चंद्रशेखरन या नियमाला अपवाद ठरतील, अशी शक्यता आहे. तथापि टाटा ट्रस्टने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

चंद्रशेखरन यांना वयाची ६५ वर्षे उलटल्यानंतरही, अधिकचा कार्यकाळ बहाल करण्याच्या निर्णयामागे समूहाच्या कामकाजात सातत्य राखणे हा हेतू आहे. समूहाकडून सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी निर्मिती यासह विमानोड्डाण क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी एअर इंडियाचा कायापालट हे महत्वाचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या यशासाठी चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. टाटा ट्रस्टने चंद्रशेखरन यांच्या निवडीचा ठराव टाटा सन्सला पाठविला आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाकडून चंद्रशेखरन यांच्या तिसऱ्या कार्यकाळास मंजुरी देताना या ठरावाचा विचार करावा लागेल, असेही सूत्रांनी म्हटल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

प्रस्ताव काय आहे?

उच्चपदस्थ सूत्रांनुसार, टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा आणि वेणू श्रीनिवासन यांनी ११ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत चंद्रशेखरन यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याचा प्रस्ताव मांडला.  हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला, असे त्यात म्हटले आहे.

उल्लेखनीय म्हणजे, चंद्रशेखरन यांचा दुसरा पाच वर्षांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२२ मध्ये मंजूर करण्यात आला. त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मधील कार्यकारी भूमिकेत असताना हा पदभार स्वीकारला. ते पहिल्यांदा ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळात सामील झाले आणि जानेवारी २०१७ मध्ये त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.

 टाटा समूहातील विविध  कंपन्यांमधील अलिकडच्या काळातील अंतर्गत आणि बाह्य आव्हाने पाहता, चंद्रशेखरन यांच्या नावाला पसंती मिळण्याचा निर्णय अनपेक्षित नाही.