मुंबई : विद्युत शक्तीवरील वाहनांची जगातील दिग्गज कंपनी टेस्ला येत्या आठवड्यात मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात तिचे पहिले अनुभूती केंद्र खुले करून अधिकृतपणे भारतात प्रवेश करीत आहे. उद्योगपती एलॉन मस्क यांच्या या कंपनीने नियोजित उद्घाटन कार्यक्रमासाठी निवडक निमंत्रितांना पाठविलेल्या निमंत्रणपत्रातून ही बाब शुक्रवारी पुढे आली.
टेस्लाला भारतात तिच्या इलेक्ट्रीक मोटारी तयार करण्यात रस नाही, तर देशात केवळ विक्री दालन स्थापन करण्यास ती उत्सुक आहे, असे गेल्या महिन्यात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी देशाच्या ‘ईव्ही धोरणा’ची घोषणा करताना स्पष्ट केले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही टेस्लाने आयात शुल्क टाळण्यासाठी भारतात मोटार निर्मिती प्रकल्प उभारला तर ते अमेरिकेसाठी अन्याय्य ठरेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर टेस्ला इंडियाने मुंबईतील लोढा लॉजिस्टिक्स पार्कमध्ये २४,५६५ चौरस फूट क्षेत्रफळाची गोदामासाठी जागा पाच वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर घेतल्याचे उघडकीस आले. तथापि या पहिल्यावहिल्या दालनांसंदर्भात ‘टेस्ला’ने अधिकृतपणे काहीही सूचित केलेले नाही.
टेस्ला सुरुवातीला आयात करात सवलतीची मागणी करत होती. ४०,००० अमेरिकी डॉलरपेक्षा कमी किमतीच्या मोटारीसाठी ७० टक्के आयात शुल्क आणि जास्त किमतीच्या मोटारीसाठी १०० टक्के आयात शुल्क भरावे लागू नये यासाठी टेस्लाचे मुख्याधिकारी अब्जाधीश एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी एप्रिल २०२४ मध्ये भारताचा दौराही योजला होता. परंतु अन्य जबाबदाऱ्यांमुळे हा नियोजित दाैरा लांबला. तथापि, वर्षाच्या सुरुवातीला वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी सांगितले की, टेस्लाला अनुरूप भारतात धोरणे तयार केली जाणार नाहीत, असे नमूद केले.