देशभरात सर्वसामान्यांपुढे वाढले जाणारे ताटभर जेवण प्रत्यक्षात स्वस्त झाले आहे. क्रिसिल मार्केट इंटेलिजेंस अँड अ‍ॅनालिटिक्सच्या अंदाजानुसार, शाकाहारी थाळीची किंमत महिना-दर-महिना आधारावर 3 टक्क्यांनी कमी झाली आहे. भाजीपाल्यांच्या किमती कमी झाल्यामुळे, डिसेंबरमध्ये शाकाहारी थाळीची किफायतशीरता वाढली आहे, त्याच वेळी मांसाहारी थाळी ५ टक्क्य़ांनी स्वस्त झाली आहे.

क्रिसिलच्या विश्लेषकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, सणासुदीचा हंगाम संपुष्टात आल्याने कांदा आणि टोमॅटोच्या किमतीत अनुक्रमे १४ टक्के आणि ३ टक्के घट झाली आहे. शाकाहारी थाळीच्या तुलनेत मांसाहारी थाळीची किंमत मोठ्या फरकाने कमी झाली. कारण चिकनच्या किमतीत ५ ते ७ टक्के घसरण झाली.

डिसेंबर २०२३ मध्ये शाकाहारी थाळीची किंमत २९.७ रुपये आहे, जी वर्षभरापूर्वीच्या किमतीच्या तुलनेत १२ टक्के अधिक महाग आहे. कारण भाज्यांच्या किमतीत तीव्र वाढ झाली होती. तर डाळींच्या किमतीत देखील वार्षिक आधारवर २४ टक्के वाढ झाली. क्रिसिलच्या अंदाजानुसार, डिसेंबर २०२२ मध्ये शाकाहारी थाळी बनवण्याची किंमत २६.६ रुपये होती. गेल्या महिन्यात मांसाहारी थाळीची किंमत ४ ते ५ टक्क्यांनी कमी होऊन ५७.६ रुपये झाली होती, जी चिकनचे भाव १५ टक्क्यांनी कमी झाल्याने स्वस्त झाली.

शाकाहारी थाळीत पोळी-भात, भाजी, डाळ तर मांसाहारी थाळीत पोळी-भात, आमटीसह मांस-मांसे असा एखादा अन्नघटक गृहीत धरला गेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थाळीकारणाची संकल्पना काय?

देशाचे तत्कालीन मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमणियन यांनी वर्ष २०१९-२० च्या आर्थिक पाहणी अहवालात जडजंबाळ आकडेमोड करण्याऐवजी अभिनव ‘थाळीनॉमिक्स’ (थाळीकारण) ही संकल्पना पुढे आणली. सामान्यत: शाकाहारी आणि मासांहारी ताटातील अन्न पदार्थासाठी देशाच्या विविध भागात पडणाऱ्या किमतींचे त्या ठिकाणच्या दैनंदिन वेतनमानाशी गुणोत्तर जुळविले जाते.