मुंबई  देशातील बँकिंग क्षेत्राने सरलेल्या मार्च महिन्यात कर्ज वितरणात चांगली वाढ नोंदविली असून, मुख्यत्वे, उद्योगधंद्यांना कर्ज वितरणाचे प्रमाण वाढले आहे. मात्र, वैयक्तिक कर्ज वितरणाचे प्रमाण लक्षणीय कमी झाले आहे. ‘केअरएज रेटिंग्ज’ने देशाच्या बँकिंग क्षेत्रातील कर्ज वितरणाचा अहवाल सोमवारी जाहीर केला आहे. यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मार्चमध्ये बँकांचे एकूण कर्ज वितरण २०.२ टक्क्यांनी वाढले आहे. या वाढीसाठी एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी यांचे विलीनीकरण कारणीभूत ठरले आहे. एचडीएफसीचे विलीनीकरण गृहित न धरता कर्ज वितरणातील वाढ १६.३ टक्के आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ती १५ टक्के होती. वैयक्तिक कर्जांमध्ये गृहकर्जाचे वितरण मार्चमध्ये ३६.९ टक्के वाढले आहे. याचवेळी वाहन कर्ज वितरणातील वाढ कमी होऊन १७.३ टक्क्यांवर आली आहे.

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 6 May 2024: बाजारात सोन्याच्या किमतीने केला कहर, १० ग्रॅमचा दर ऐकून तुमचे मन होईल थक्क

व्यावसायिक कर्जांमध्ये मार्च महिन्यात १६.३ टक्के वाढ झाली आहे. त्यात उद्योग आणि सेवांचा समावेश प्रामुख्याने आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ही वाढ १२.५ टक्के होती. एचडीएफसीचे विलीनीकरण गृहित न धरताही यंदा मार्चमधील वाढ १४.६ टक्के असून, ती गेल्या वर्षीच्या मार्चच्या तुलनेत जास्त आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मार्चमध्ये सेवा क्षेत्रासाठीच्या कर्ज वितरणात २२.९ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. त्या खालोखाल व्यापार, बांधकाम आणि बँकेतर वित्तीय सेवांचा (एनबीएफसी) समावेश आहे.

सरकारी बँकांच्या समभागांत पडझड

रिझर्व्ह बँकेने अंमलबजावणी सुरू असलेल्या प्रकल्पांना कर्ज देण्याबाबत कठोर नियम प्रस्तावित केल्यानंतर सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या समभागांमध्ये घसरणीसह याचे नकारात्मक पडसाद सोमवारी उमटले. मुंबई शेअर बाजारात पंजाब नॅशनल बँकेचे समभाग ६.४१ टक्के, कॅनरा बँक ५.४२ टक्के, बँक ऑफ बडोदा ३.७१ टक्के आणि युनियन बँक ३.१२ टक्क्यांनी घसरले. स्टेट बँकेच्या समभागात २.८६ टक्क्यांनी, तर बँक ऑफ इंडियामध्ये २.५७ टक्क्यांनी घसरण दिसून आली.

त्याचप्रमाणे, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनला ८.९३ टक्के आणि रूरल इलेटक्ट्रिफिकेश कॉर्पोरेशनला ७.३५ टक्क्यांचे नुकसान सोसावे लागले. प्रस्तावित बदलांनुसार कर्ज दिलेल्या पायाभूत प्रकल्पांच्या बांधकामाधीन टप्प्यात बँकांना ५ टक्क्यांपर्यंत उच्च तरतूद करावी लागणे समाविष्ट आहे.