नवी दिल्ली: ओडिशातील गोपाळपूर बंदराची विक्री अदानी पोर्ट्स ॲण्ड सेझ कंपनीला ३ हजार ३५० कोटी रुपयांना केल्याची घोषणा शापूरजी पालनजी (एसपी) समूहाने मंगळवारी केली. २०१७ मध्ये एसपीने समूहाने ताब्यात घेतलेल्या या बंदराच्या विक्रीने बंदरांच्या क्षेत्रात अदानी समूहाच्या सामर्थ्यात आणखी भर पडली आहे.

वार्षिक २ कोटी टन माल हाताळणी क्षमता असलेले गोपाळपूर बंदराचे बांधकाम अद्याप सुरू आहे. पेट्रोनेट एलएनजीने या बंदरात एलएनजीचे पुन्हा वायूत रूपांतरण करण्यासाठी टर्मिनल उभारण्यासाठी नुकताच करार केला आहे. यामुळे बंदराला दीर्घकालीन उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध झाला आहे. बांधकाम, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या एसपी समूहाकडून कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्याअंतर्गतच हे निर्गुंतवणुकीचे पाऊल उचलण्यात आले.

हेही वाचा >>>गौतम अदाणींचे अच्छे दिन! अदाणी पोर्ट्सने ३०८० कोटींना खरेदी केलं गोपाळपूर बंदर

एसपी समूहाकडून गेल्या काही महिन्यांत विक्री करण्यात आलेले गोपाळपूर हे दुसरे बंदर ठरले आहे. या आधी महाराष्ट्रातील धरमतर बंदर तिने जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला ७१० कोटी रुपयांना विकले आहे. कंपनीने २०१५ मध्ये हे बंदर ताब्यात घेतले होते. या बंदराची वार्षिक क्षमता सुरूवातीला १० लाख टनांपेक्षा कमी होती. आधुनिकीकरणापश्चात ही क्षमता आता ५० लाख टनांवर जाणे अपेक्षित आहे.

बंदर क्षेत्रात वाढते सामर्थ्य

अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स ॲण्ड सेझ या कंपनीकडे पश्चिम किनारपट्टीवर (मुंद्रा, तुना, दहेज, आणि गुजरातमधील हझिरा, गोव्यातील मुरगाव, महाराष्ट्रातील दिघी आणि केरळमधील विझिंजम) सात सामरिकदृष्ट्या महत्त्वाची बंदरे आणि टर्मिनल असून, ही भारतातील सर्वात मोठी बंदर विकसक आणि चालक कंपनी आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरही (पश्चिम बंगालमधील हल्दिया, ओडिशातील धामरा, आंध्र प्रदेशातील गंगावरम आणि कृष्णपट्टिणम, तामिळनाडूमधील कट्टुपल्ली आणि एन्नोर आणि पुद्दुचेरीमधील कराईकल) अशी तिच्या मालकीची सात बंदरे आणि टर्मिनल आहेत. देशाच्या एकूण बंदर व्यापारापैकी २७ टक्क्यांचे प्रतिनिधित्व ही कंपनी करते.