लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : भांडवली बाजाराच्या व्यवहार यंत्रणेत निवडणूक मतमोजणीच्या दिवशी म्हणजे ४ जूनला कोणताही तांत्रिक बिघाड झालेला नव्हता, असा खुलासा मुंबई शेअर बाजाराने शुक्रवारी केला. मात्र निर्देशांकात मोठी पडझड झालेल्या त्या दिवशी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे व्यवहार करूनही, प्रत्यक्ष खात्यात युनिट्सचे खरेदीचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) नंतरच्या दिवसाचे दिसत असल्याच्या तक्रारी गुंतवणूकदारांच्या मोठ्या वर्गाने केल्या आहेत. तथापि बीएसईने बँकांवर सारा दोष ढकलून अंग झटकले आहे.

अनेक गुंतवणूकदारांनी, त्यांचे म्युच्युअल फंडातील व्यवहार ४ जूनला पूर्ण झाले नाहीत, अशा तक्रारी समाजमाध्यमांवर केल्या आहेत. बाजारात पडझडीने खालच्या स्तरावर अनेक गुंतवणूकदारांनी त्यासमयी म्युच्युअल फंडात खरेदी केली. दुपारचे दोन या ‘कट-ऑफ’ वेळेच्या आधी म्युच्युअल फंड खरेदी होऊन, प्रत्यक्ष खात्यावर एनएव्ही हे ४ जूनऐवजी, ५ जून म्हणजे बाजारातील उसळीनंतर मूल्य वाढलेल्या वरच्या पातळीवर जमा झाले. त्यातून गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यावर मुंबई शेअर बाजाराने केलेल्या खुलाशात म्हटले आहे की, बीएसई क्लिअरिंग हाऊसमध्ये (आयसीसीएल) ४ जूनला कोणताही तांत्रिक बिघाड झालेला नव्हता. देयक उपयोजन आणि बँकांकडून आर्थिक व्यवहारांचे तपशील मिळण्यास विलंब झाला. यामुळे काही ग्राहकांच्या खात्यात खरेदी केलेल्या युनिट्सचे एनएव्ही जमा होण्यास विलंब झाला.

हेही वाचा >>>Gold-Silver Price: घसरणीनंतर सोन्याने घेतली उंच उडी; चांदीही महाग, १० ग्रॅमची किंमत ऐकून ग्राहकांना फुटला घाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई शेअर बाजाराच्या म्युच्युअल फंड व्यवहार यंत्रणेत ४ जूनला तांत्रिक बिघाड झाल्याचा तक्रारी, ग्रो, झीरोधा, अपस्टॉक्स, एंजल वन आणि तत्सम अनेक ब्रोकिंग मंचांनीही केला आहे. मागणी नोंदवूनही ग्राहकांना दुसऱ्या दिवसाच्या वाढलेल्या एनएव्हीवर म्युच्युअल फंड खरेदीचे युनिट्स जमा झाल्याचे त्यांचेही म्हणणे आहे. भांडवली बाजारात ४ जूनला लोकसभा निवडणुकीच्या निकालादिनी मोठी पडझड झाली होती. निर्देशांकांच्या सहा टक्क्यांहून मोठ्या आपटीसह, गुंतवणूकदारांचे त्या सत्रात ३१ लाख कोटी रुपये पाण्यात गेले होते.