मुंबई: आघाडीचा वस्तू विनिमय बाजारमंच असलेल्या ‘मल्टी कमॉडिटी एक्सचेंज’ अर्थात ‘एमसीएक्स’वरील मंगळवारच्या सत्रात तांत्रिक बिघाडामुळे खरेदी-विक्री व्यवहार उशिराने सुरू झाले. तांत्रिक अडचणीमुळे सर्व व्यवहार चार तास उशिराने सुरू करावे लागले. शिवाय सर्व व्यवहार आपत्कालीन पुनर्प्राप्ती संकेतस्थळावर हलवावे लागले.
दुपारी १ वाजून २५ मिनिटांनंतर सर्व व्यवहार प्रणाली सामान्यपणे कार्यरत झाली असून या तांत्रिक बिघाडाची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे ‘एमसीएक्स’ने स्पष्ट केले. तांत्रिक बिघाड आणि त्यावर आवश्यक सुधारणात्मक उपाययोजना राबविण्यासाठी ‘एमसीएक्स’ प्रयत्नशील आहे, अशी माहिती ‘एमसीएक्स’ने इतर बाजारमंचांना दिली.
तांत्रिक बिघाडामुळे ‘एमसीएक्स’वरील व्यापार ४ तासांहून अधिक काळ विस्कळीत झाले होते. ज्यामुळे सत्र सुरू होण्यास विलंब झाला आणि बाजारातील सहभागींमध्ये अनिश्चितता निर्माण झाली होती. ‘एमसीएक्स’ने सुरुवातीला सकाळी ९:३० वाजता व्यवहार सुरू केले, मात्र पुढे निरंतर व्यत्यय येत राहिला. त्यामुळे सकाळी १०, १०:३०, ११:४९ आणि दुपारी १२:३५ पर्यंत अडखळतच व्यवहार सुरू होते. दुपारी १:२० ते १:२४ दरम्यान विशेष सत्राची घोषणा केली गेली आणि त्यानंतर दुपारी १:२५ वाजता सामान्य व्यवहार सुरू झाले. या व्यत्ययामुळे सोने, चांदी, खनिज तेल आणि तांबे, जस्त आणि ॲल्युमिनियम यासारख्या धातूंच्या कमॉडिटी करारांमध्ये व्यापार प्रभावित झाला.
यापूर्वी चालू वर्षात जुलैमध्ये, तांत्रिक बिघाडामुळे बाजार उघडण्यास एक तासापेक्षा अधिक उशीर झाला होता. त्या आधी, फेब्रुवारी २०२४ मध्ये देखील बाजारमंचाला चार तासांसाठी कामकाज स्थगित करावे लागले होते.
मुंबई शेअर बाजारात एमसीएक्सचा समभाग २.०५ टक्क्यांनी घसरून ९,११८.१५ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या बाजार भावानुसार, कंपनीचे ४६,४९२ कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.
