मुंबई : अमेरिकी न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिरिक्त व्यापार शुल्काला स्थगिती दिल्याने जागतिक भांडवली बाजारांमध्ये तेजीचे प्रतिबिंब उमटले. परिणामी सलग दोन सत्रातील घसरणीनंतर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३२०.७० अंशांची वाढ झाली आणि तो ८१,६३३.०२ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ५०४.५७ अंशांची तेजी दर्शवत ८१,८१६.८९ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. मात्र पुन्हा ८२,००० अंशांच्या पातळीला स्पर्श करण्यास अयशस्वी ठरला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ८१.१५ अंशांची भर पडून तो २४,८३३.६० पातळीवर पोहोचला.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातीवरील मोठ्या प्रमाणात लादण्यास आलेल्या व्यापार शुल्काला रोखण्याच्या अमेरिकी न्यायालयाच्या निर्णयावर गुंतवणूकदारांनी आनंद व्यक्त केला. अमेरिकेच्या न्यायालयाने ट्रम्प यांच्या व्यापार शुल्क धोरणाला रद्दबातल ठरवल्यानंतर जागतिक भांडवली बाजारांमध्ये उत्साह संचारला. मात्र, खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिकेच्या १० वर्ष मुदतीच्या रोख्यांवरील वाढत्या परताव्यादरामुळे तेजी मर्यादित राहिली. व्यापार तणाव निवळण्याच्या शक्यतेने देशांतर्गत आघाडीवर माहिती तंत्रज्ञान आणि औषधी निर्माणसारख्या निर्यात-केंद्रित क्षेत्रांनी चांगली कामगिरी केली, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, इंडसइंड बँकेचा समभाग सर्वाधिक तेजीत होता. त्यापाठोपाठ सन फार्मा, अदानी पोर्ट्स, इटरनल, टाटा स्टील, टेक महिंद्र आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग वधारले. तर बजाज फायनान्स, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह आणि एशियन पेंट्स या कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, बुधवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ४,६६२.९२ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.

सेन्सेक्स ८१,६३३.०२ ३२०.७० ०.३९%
निफ्टी २४,८३३.६० ८१.१५ ०.३३%

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेल ६५.८२ १.४२%
डॉलर ८५.४८ १० पैसे