पुणे : लोकमान्य हॉस्पिटल्समध्ये उनाप्राईम हेल्थकेअर एलएलपीने १४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीसह उनाप्राईमने हॉस्पिटलमधील ८४.५ टक्के हिस्सा संपादित केला आहे. आगामी काळात राज्यात रुग्णालयांची साखळी उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
याबाबत लोकमान्य हॉस्पिटल्सचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मनप्रीत सोहल आणि लोकमान्य हॉस्पिटल्सचे अध्यक्ष व मुख्य सांधेरोपण शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र वैद्य यांनी ही घोषणा केली. लोकमान्य हॉस्पिटल्सने महत्त्वाकांक्षी विस्तार योजना आखली आहे. यामध्ये पुढील ३ ते ४ वर्षांत ३०० रुग्णशय्यांपासून ८०० रुग्णशय्यांपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. याचबरोबर हृदयरोग, चेताविकार, कर्करोग, रोबोटिक शस्त्रक्रिया आणि अवयव प्रत्यारोपण या सुविधा उभारण्यात येणार आहेत. पुण्यासह राज्यभरात या सुविधांची उभारणी केली जाणार आहे.
उनाप्राईम हेल्थकेअर सोबतच्या भागीदारीमुळे लोकमान्य हॉस्पिटल्स राज्यात मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांची साखळी विकसित करेल. रोबोटिक शस्त्रक्रियांमधील आमच्या कौशल्यांमुळे आरोग्य सेवेतील एक प्रमुख राष्ट्रीय केंद्र म्हणून ओळख प्राप्त होईल. बहुअवयव प्रत्यारोपण आणि व्यापक कर्करोग उपचार सेवा यांमुळे रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असे मनप्रीत सोहल यांनी सांगितले. आशियामधील रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये अग्रगण्य संस्था म्हणून आम्ही पाया रचला आहे.
आता राज्यातील सर्वांत प्रगत मल्टीस्पेशालिटी व क्वार्टनरी केअर रुग्णालय साखळी स्थापन करण्याच्या आमच्या प्रवासाला सुरुवात करीत आहोत. व्यापक उपचार सेवांमधील आमच्या विस्तारामुळे येथील रुग्णांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होतील, असे डॉ. नरेंद्र वैद्य यांनी नमूद केले.