Union Budget 2024-2025 : केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याची “लॉक इन” प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी दरवर्षी हलवा समारंभ आयोजित केला जातो. गेल्या तीन वर्षांपासून पेपरलेस अर्थसंकल्प सादर करण्यात येतो आहे. यावेळीसुद्धा पेपरलेस पद्धतीने अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण सात दिवसांनंतर १ फेब्रुवारी २०२४ रोजी २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत नॉर्थ ब्लॉकमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रत्येक वेळी अर्थसंकल्पापूर्वी समारंभ आवश्यक असतो. चला जाणून घेऊया हलवा समारंभ का महत्त्वाचा आहे.
हलवा समारंभ म्हणजे काय?
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी हलवा समारंभ साजरा करणे ही फार जुनी परंपरा आहे. अर्थमंत्रालयात हलवा समारंभासाठी हलवा बनवला जातो. ही परंपरा दरवर्षी केली जाते, कारण आपल्या देशात कोणतेही मोठे आणि चांगले काम करण्यापूर्वी तोंड गोड करणे शुभ मानले जाते. बजेटपूर्वी तोंड गोड करण्यासाठी हलवा समारंभ आयोजित केला जात असून, अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्री या कार्यक्रमाचे आयोजन करतात. हा हलवा समारंभ म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प अंतिम झाल्याची शाश्वती असते. आता त्याच्या छपाईचे काम सुरू झाले आहे. या समारंभात मोठ्या संख्येने अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. प्रदीर्घ काळ चाललेला अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया संपल्यानंतर तोंड गोड करून अर्थसंकल्पाच्या छपाईला औपचारिक हिरवा झेंडा दाखवण्यात येतो. कढईतून हलवा देऊन अर्थमंत्री अर्थसंकल्पाला हिरवा कंदील दाखवतात. हा सोहळा अर्थ मंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात होतो. बजेट छापण्यासाठी इथे खास प्रिंटिंग प्रेस आहे. बजेट बनवण्याच्या प्रक्रियेत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट असते. अर्थ मंत्रालयात बाहेरचा कोणीही प्रवेश करू शकत नाही. बजेट तयार करण्यात गुंतलेले कर्मचारी आणि अधिकारी बाहेरच्या व्यक्तीला भेटू शकत नाहीत.
हेही वाचाः ५ वर्षांत १.२५ लाख कोटींचे २०० रोपवे प्रकल्प; नितीन गडकरींचं पर्वतोड्डाण
२०२२ मध्ये हलवा समारंभ झाला नाही
कोविडमुळे २०२२ मध्ये हा विधी पार पडला नाही. त्यानंतर त्यांच्या कार्यालयातच कर्मचाऱ्यांना मिठाई देण्यात आली. दरवर्षी अर्थसंकल्पाची छपाई सुरू होण्यापूर्वी हलवा समारंभ होतो. हा हलवा अर्थ मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना दिला जातो. हलवा समारंभापासून १ फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना अर्थमंत्रालयातच राहावे लागते. तेव्हा तो त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्कही करू शकत नाही. या काळात ते त्यांच्या कुटुंबाशी बोलू शकत नाहीत आणि त्यांना त्यांच्यापासून दूर राहावे लागते. अर्थसंकल्पाची गोपनीयता राखण्यासाठी हे केले जाते. अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२४ रोजी सादर होणार आहे.
१ फेब्रुवारी २०२४ रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी २०२४ रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मोठमोठ्या घोषणांसाठी पुढच्या वर्षीच्या पूर्ण अर्थसंकल्पापर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले आहेत. जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. एप्रिल-मे २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यानंतर केंद्रात नवे सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल.