पीटीआय, नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी उत्तर प्रदेशातील जेवर येथे ३,७०६ कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर अर्थात अर्धसंवाहक प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली आहे. सुरुवातीला महाराष्ट्र आणि त्यांनतर गुजरातमध्ये जाणारा अर्धसंवाहक निर्मिती प्रकल्प अखेर उत्तर प्रदेशच्या पारड्यात पडला आहे. एचसीएल-फॉक्सकॉन यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि ऑटोमोबाईल्ससाठी डिस्प्ले ड्रायव्हर चिप तयार करणार आहेत. या प्रकल्पामध्ये दरमहा २०,००० सेमीकंडक्टर वेफर्स हाताळण्याची क्षमता असेल आणि दरमहा ३.६ कोटी चिप तयार केल्या जातील, असे माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना सांगितले. हा प्रकल्प मोबाईल फोन, लॅपटॉप, ऑटोमोबाईल्स आणि इतर उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डिस्प्लेसाठी ड्रायव्हर चिप बनवेल.
मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील जेवर येथे सहावा सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली आहे. डिस्प्ले ड्रायव्हर चिप तयार करण्यासाठी एचसीएल आणि फॉक्सकॉन यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. या चिप स्क्रीनवर प्रदर्शित होणाऱ्या कंटेंटची गुणवत्ता आणि स्वरूप नियंत्रित करतात. हे एक अतिशय प्रगत तंत्रज्ञान आहे. फॉक्सकॉन ही इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे, ज्यामध्ये ॲपलचा आयफोन देखील समाविष्ट आहे.
एचसीएल-फॉक्सकॉन संयुक्त उपक्रम २०२७ मध्ये कार्यान्वित होण्याची आशा आहे. या प्रकल्पामुळे सुमारे २००० लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योग सध्या सुमारे २५ लाख लोकांना रोजगार देत आहे.