पीटीआय, नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्य संख्येत जूनमध्ये २१ लाख ८९ हजार सदस्यांची भर पडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १३.४६ टक्के वाढ नोंदविण्यात आली असून, एप्रिल २०१८ नंतरची ही विक्रमी वाढ ठरली आहे.केंद्रीय कामगार मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या जून महिन्यातील सदस्य संख्येची माहिती जाहीर केली आहे. यानुसार, संघटनेच्या सदस्य संख्येत जूनमध्ये २१ लाख ८९ हजारांची भर पडली. एप्रिल २०१८ नंतरची सदस्य संख्येतील ही विक्रमी वाढ ठरली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये सदस्यांची संख्या ९.१४ टक्क्यांनी वाढली आहे. रोजगाराच्या संधीतील वाढ आणि कर्मचाऱ्यांमध्ये भविष्य निर्वाह निधीबद्दल वाढत असलेली जागरूकता यामुळे सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
संघटनेने जून महिन्यात १० लाख ६२ हजार नवीन सदस्यांची नोंदणी केली. मे महिन्याच्या तुलनेत त्यात १२.६८ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. याचबरोबर गेल्या वर्षातील जूनच्या तुलनेत ही वाढ ३.६१ टक्के आहे. सदस्यांमध्ये १८ ते २५ वयोगटातील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. नवीन सदस्यांपैकी ६ लाख ३९ हजार म्हणजेच ६०.२२ टक्के सदस्य हे या वयोगटातील आहेत. मे महिन्याच्या तुलनेत या वयोगटातील नवीन सदस्यांच्या संख्येत जूनमध्ये १४.०८ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे, असे कामगार मंत्रालयाने नमूद केले आहे.
महिलांच्या संख्येत वाढ
ईपीएफओच्या महिला सदस्यांच्या संख्येतही जूनमध्ये वाढ झाली आहे. जूनमधील एकूण नवीन सदस्यांमध्ये ३ लाख २ हजार महिला आहेत. मे महिन्याच्या तुलनेत त्यात १४.९२ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या जूनच्या तुलनेत त्यात १.३४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे, असेही कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.