मुंबई : यंदाच्या सणासुदीच्या काळात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) हा सर्वात पसंतीचा देयक व्यवहाराचा पर्याय ठरला, ज्याने ग्राहकांच्या सैलावलेल्या खर्चाला आणि मागणीतील वाढीला दर्शविले, असे बँक ऑफ बडोदाने प्रसिद्ध केलेल्या अहवालाने नमूद केले. बँक ऑफ बडोदाकडून संकलित आकडेवारी दर्शविते की, सरलेल्या सप्टेंबरमध्ये, ऑनलाइन बाजारपेठेतील, कपडे इलेक्ट्रॉनिक्स, सौंदर्य प्रसाधने आणि ब्युटी पार्लर तसेच मद्यावरील खर्चातही मोठी वाढ झाली. या श्रेणींमध्ये वार्षिक तुलनेत दुहेरी अंकातील वाढ नोंदवली गेली, जी सणोत्सवी मागणी आणि वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी कपातीचा परिणामही दर्शविणारी होती.

यंदाच्या सणासुदीच्या काळात यूपीआय व्यवहारांचे मूल्य लक्षणीय वाढून १७.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे गेल्या वर्षी याच कालावधीत १५.१ लाख कोटी रुपये पातळीवर होते. एकंदरीत डिजिटल पेमेंट्सचा वापर हा विशेषतः दसरा आणि दिवाळीसारख्या प्रमुख सणांमध्ये खर्चाच्या पद्धतींना कसा चालना देणारा ठरतो, हे यातून अधोरेखित झाले आहे.सप्टेंबर २०२५ मध्ये, यूपीआय व्यवहारांनी महिनागणिक मूल्यात २.६ टक्क्यांची स्थिर वाढ नोंदवली. यूपीआय बरोबरीनेच, डेबिट कार्डचा वापर देखील वाढला. सणासुदीच्या काळात त्यायोगे देयकाचे प्रमाण ६५,३९५ कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील वर्षातील २७,५६६ कोटी रुपयांवरून जवळपास अडीच पटीने वाढले. दुसरीकडे, क्रेडिट कार्ड व्यवहारांमध्ये मात्र ग्राहकांचा संयम दिसून आला.

प्रति व्यवहार सरासरी खर्चाच्या अंगाने, डेबिट कार्डाद्वारे प्रति व्यवहार सरासरी ८,०८४ रुपये खर्च केले गेले, तर यूपीआय व्यवहारांबाबत हेच प्रमाण सरासरी १,०५२ रुपये आणि क्रेडिट कार्डसाठी १,९३२ रुपये असे राहिले. यावरून यूपीआय हा छोट्या आणि मध्यम मूल्याच्या खरेदीसाठीचा पर्याय राहिला आहे, तर डेबिट कार्ड उच्च मूल्याच्या देयक व्यवहारांसाठी वापरात आले.

दरवर्षी सणांच्या दिवसांच्या संख्येनुसार केल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाच्या विश्लेषणानुसार, यंदाच्या व्यवहारांच्या प्रमाणात वाढ ही एकंदर मागणीतील सुधारणा दर्शविणारी आहे. या मागे अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या प्राप्तिकर सवलतीचा लाभ आणि जीएसटी कपात यासारखे संरचनात्मक घटक ही घरगुती खर्चात वाढीस चालना देणारे ठरले आहेत. मागणीतील तेजीचा हा कल ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीतही कायम राहील, असे अहवालाने नमूद केले आहे.