पीटीआय, नवी दिल्ली
भारतात मोठ्या संख्येने कर्मचारी असणारी अमेरिकेतील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कॉग्निझंट, स्थापनेपासून जवळपास तीन दशकांनंतर भारताच्या भांडवली बाजारात पदार्पणाची शक्यता आजमावत आहे. भारतात प्रारंभिक समभाग विक्री अर्थात आयपीओ किंवा दुय्यम सूचिबद्धता अशा दोन्ही शक्यतांचा सक्रियपणे माग घेतला जात आहे, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेच स्पष्ट केले.
अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे मुख्यालय असलेल्या कॉग्निझंटचे समभाग त्या देशातील नॅसडॅक शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. संभाव्य दुय्यम सूचिबद्धतेमुळे नॅसडॅकवर आधीच जारी केलेले शेअर्स हे कॉग्निझंटला भारतीय शेअर बाजारावरही व्यवहारास खुले करण्यास सक्षम बनवेल. यामुळे भारतीय गुंतवणूकदारांमध्ये या शेअर्सची दृश्यमानता वाढेल आणि बाजारातील त्यांची तरलताही वाढेल. त्या उलट ‘आयपीओ’द्वारे प्राथमिक बाजारात सामान्यतः नवीन शेअर्स जारी करून नवीन भांडवल उभारणे कंपनीकडून प्रस्तावित केले जाईल.
कॉग्निझंटचे संचालक मंडळ आणि व्यवस्थापन संघ हे नियमितपणे भागधारकांचे मूल्य वाढवण्याच्या संधींचे मूल्यांकन करत असते. या उद्देशाने, आम्ही आमच्या कायदेशीर आणि आर्थिक सल्लागारांकडे भारतातील संभाव्य प्राथमिक बाजारातील विक्री आणि दुय्यम सूचीबद्धता अशा दोन्ही शक्यतांचे मूल्यांकन करत आहोत, असे कॉग्निझंटचे मुख्य वित्तीय अधिकारी जतीन दलाल यांनी कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीच्या कामगिरीच्या घोषणेदरम्यान सांगितले.
ही चाचपणी अद्याप प्रारंभिक टप्प्यात असे स्पष्ट करत दलाल म्हणाले की, परदेशी कंपनीद्वारे भारतात प्राथमिक बाजारात विक्री आणि दुय्यम सूचीबद्धतेची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे आणि त्यात अनेक टप्पे समाविष्ट आहेत. म्हणूनच आम्ही याकडे एक दीर्घकालीन प्रकल्प म्हणून पाहात आहोत. याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही आणि आम्ही या दोन्ही शक्यतांचे तूर्तास केवळ मूल्यांकन करत आहोत. या मूल्यांकनांत भारत आणि अमेरिका दोन्ही देशांमधील विविध भागधारकांना सहभागी करून घेत आहोत आणि आमच्या भागधारकांच्या सर्वोत्तम हितासाठी दोहोंपैकी कोणती शक्यता अधिक चांगली यावर अंतिम निर्णय अवलंबून असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रस्तावित नियोजनाप्रमाणे कॉग्निझंटचे समभाग भारताच्या बाजारात सूचिबद्ध झाले तर देशातील ती दुसऱ्या क्रमांकाची सूचिबद्ध आयटी कंपनी ठरेल. टाटा कन्सल्टन्सी लिमिटेड (टीसीएस) ही सध्या देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असून, तिच्या पाठोपाठ कॉग्निझंटचे स्थान असेल. शिवाय अमेरिका आणि भारत अशा दोन्ही शेअर बाजारात समभागांची सूचिबद्धता असलेल्या बेंगळुरूस्थित प्रमुख आयटी कंपन्या इन्फोसिस आणि विप्रोनंतर, अशी दुहेरी सूचिबद्धता असणारी ही तिसरी कंपनी असेल.
कॉग्निझंटची जगभरातील कर्मचारी संख्या ही सरलेल्या सप्टेंबरअखेर ३,४९,८०० झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे यातील जवळपास ८५ टक्के अर्थात पावणे तीन लाख कर्मचारी हे भारतात कार्यरत आहेत. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कंपनीने ६,००० कर्मचारी नव्याने जोडले आहेत.
