Tariff War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापार युद्धाचा परिणाम जगभरातील बाजारावर पाहायला मिळत आहे. यातच ट्रम्प यांनी चीनी मालावर १०४ टक्के आयातशुल्क लादण्याची घोषणा ८ एप्रिल रोजी केली आहे. यानंतर आता चीनने देखील सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. चीनने देखील अमेरिकन वस्तूंवर ८४ टक्के वाढीव आयातशुल्क लादण्याची घोषणा केली आहे. यामुळे अमेरिका-चीन व्यापार युद्ध आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर अमेरिकेने शुल्क वाढीवर प्रतिक्रिया दिली आहे.
अमेरेकिचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट ( Scott Bessent) यांनी फॉक्स बिझनेस नेटवर्कशी बोलताना, चीनने लादलेले शुल्क हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच चीनने व्यापार युद्धातून बाहेर पडण्यासाठी अवमूल्यन करण्याचा प्रयत्न करू नये, असेही बसेंट यांनी सुचवले आहे. याबरोबरच बिजिंगने चर्चेसाठी एकत्र यावे असे अवाहन देखील त्यांनी केले आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, याऐवजी चीनने फेंटानिलची अमेरिकेत निर्यात करणार्यांना शिक्षा करणे गरजेचे आहे. हा मुद्दा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे बराच काळापासून उपस्थित करत आहेत.
फेंटानिलच्या मुद्द्यावर अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेत होणारी फेंटानिलची निर्यात थांबवण्यासाठी बीजिंगने फार काही प्रयत्न केले नाहीत असा आरोप ट्रम्प यांनी केला होता. यानंतर चीन आणि अमेरिका यांच्यातील तणाव निर्माण झाला होता. तर यावेळी चीनने ट्रम्प प्रशासनावर शुल्क वाढवण्यासाठी या मुद्द्याचा वापर केल्याचा आरोप केला होता. यावेळी चिनी परराष्ट्रमंत्र्यांनी हे ‘ब्लॅकमेल’ असल्याचेही म्हटले होते.
ट्रेझरी सेक्रेटरी बेसेंट यांनी पुढे त्यांच्या निवेदनात अमेरिकेत येणार्या मित्र राष्ट्रांनी चीनचे संतुलन पुन्हा कसे साधावे याबद्दल विचार केला पाहिजे असेही म्हटले आहे.
जगभरातील बाजारांवर परिणाम
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने चिनी आयातीवरील १०४ टक्के शुल्क लादल्यानंतर चीनने देखील अमेरिकन वस्तूंवर ८४ टक्के वाढीव आयात कर लादण्याची घोषणा केल्यामुळे याचा फटका आता जगभरातील आणखी काही देशांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.अमेरिका आणि चीनमधील हे ‘टॅरिफ वॉर’ आणखी तीव्र होत असून याचा परिणाम जागतिक व्यापारावर होण्याची शक्यता आहे.
चीनने अमेरिकेवर आधी हे शुल्क ३४ टक्के लादण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अमेरिकेने चिनी आयातीवरील १०४ टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतल्याने चीनने पुन्हा प्रत्युत्तरात अमेरिकन वस्तूंवर ८४ टक्के वाढीव शुल्क लादण्याची घोषणा केली. यासंदर्भात चीनच्या अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की, “चीनवर अमेरिकेने वाढवलेले शुल्क ही एक चूक आहे. जी चीनच्या कायदेशीर हक्कांचे आणि हितांचे गंभीर उल्लंघन करते आणि नियमांवर आधारित बहुपक्षीय व्यापार प्रणालीला गंभीरपणे कमकुवत करते”, असं म्हटलं आहे.