US Reciprocal Tariffs on India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातल्या देशांसह भारतावरही Reciprocal Tariff लागू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळत आहेत. मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्राचे व्यवहार सुरू होताच शेअर बाजार तब्बल ५०० अंकांनी कोसळल्याचं दिसून आलं. पाठोपाठ निफ्टीही हाराकिरी करत १५० अंकांनी खाली आला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ अस्त्रामुळे भारतीय गुंतवणूकदारांवर संकट ओढवल्याचं दिसत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल २६ टक्के समन्यायी व्यापार कर अर्थात रेसिप्रोकल टेरिफ लागू केले आहे. परिणामी अमेरिकन शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाल्याचं दिसून आलं. आज बाजार सुरू होताच सेन्सेक्स तब्बल ५०० अंकांनी कोसळून थेट ७६, १२० पर्यंत खाली आला.

सेन्सेक्सपाठोपाठ निफ्टीनंही हाराकिरी केली असून Nifty50 १५० अंकांनी घसरला असून २३,१८२ पर्यंत खाली आला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये शेअर विक्रीचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर या शेअर बाजारांमध्ये अचानक चढ-उतार दिसू लागले आहेत. सकाळच्या पहिल्या तासाभरात निफ्टी५० मध्ये डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज, सन फार्मा, सिप्ला, एनटीपीसी व पॉवरग्रीड या शेअर्सला चांगला नफा झाल्याचं दिसून आलं. त्याचवेळी एचसीएल टेक, इन्फोसिस, टीसीएस, बजाज ऑटो आणि टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती घटल्याचं पाहायला मिळालं.

रूपयाची किंमत घटली

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम रुपयाचं अवमूल्यन होण्यातही दिसून आलं. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत २४ पैशांनी घटल्याचं दिसून आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातल्या सर्व देशांमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर सरसकट १० टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. त्याचबरोबर काही निवडक देशांवर मोठ्या प्रमाणावर समन्यायी व्यापार कर लागू केला आहे. त्यात भारतावर २६ टक्के कर लागू करण्यात आला आहे. चीनवर ३४ टक्के तर व्हिएतनामवर तब्बल ४६ टक्के व्यापार कर लागू करण्यात आला आहे. अमेरिकेतील बाजारपेठेत या दोन देशांमधून येणारा माल भारतीय मालासाठी प्रमुख स्पर्धक ठरत असल्याने नव्याने जाहीर केलेले व्यापार कर भारतासाठी एकीकडे तोट्याची शक्यता दर्शवत असताना दुसरीकडे काही अंशी फायदा होण्याचीही चिन्हं असल्याची चर्चा आहे.