पीटीआय, नवी दिल्ली
खाणकाम क्षेत्रातील वेदान्त लिमिटेडच्या पोलाद, तेल आणि वायू, वीज आणि स्टील या पाच प्रमुख व्यवसायांचे विद्यमान वर्षात सप्टेंबरअखेरपर्यंत विलगीकरण पूर्ण होण्याची अपेक्षा वेदान्तचे मुख्य वित्तीय अधिकारी अजय गोयल यांनी व्यक्त केली. कंपनीने जून-जुलैपर्यंत एक तिमाहीसाठी विलगीकरण पुढे ढकल्याचे यापूर्वी सांगितले होते.
दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस विलगीकरण पूर्ण करण्याच्या मार्गावर आहोत. सप्टेंबरच्या अखेरीस, विलगीकरण पूर्ण होईल अशी आशा आहे, असे गोयल यांनी सांगितले. वेदान्त लिमिटेडच्या विलगीकरणाला ९९.९९ टक्के भागधारकांनी यापूर्वीच मंजुरी दिली आहे. कंपनीने याआधी सहा स्वतंत्र सूचिबद्ध कंपन्यांची आखणी करत असल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतर विलगीकरण योजनेमध्ये बदल करत वेदान्त बेस मेटल ही कंपनी मुख्य कंपनीसोबतच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. भागधारकांच्या गुंतवणुकीचे मूल्यवर्धन करण्यासाठी आणि व्यवसायानुरूप सुसूत्रीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
खाणकाम क्षेत्रातील वेदान्त जस्त, चांदी, शिसे, ॲल्युमिनियम, क्रोमियम, तांबे, निकेल यांच्या उत्खननांत कार्यरत आहे. याचबरोबर तेल आणि वायू, पोलाद, स्टील, वीज, कोळसा आणि अक्षय्य ऊर्जेसह विविध क्षेत्रांत वेदान्त पॉवर तिचा व्यवसाय विस्तार आहे. कंपनीने सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले ग्लासच्या निर्मितीमध्ये प्रवेश केला आहे. कंपन्या विलग झाल्यानंतर, प्रत्येक सूचिबद्ध कंपनीला स्वतंत्र व्यवस्थापन, भांडवल उपलब्ध होईल. शिवाय संभाव्य आणि वास्तविक मूल्यापर्यंत वाढण्याचे अधिक स्वातंत्र्य असेल. प्रत्येक कंपनीची स्वतःची बाजारपेठ, मागणी-पुरवठा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता वाढवण्याची क्षमता आहे.