अब्जाधीश उद्योगपती यांच्या वेदांता समूह हा वित्तीयदृष्ट्या तकलादू असून, समूहाची पालक कंपनी ही कर्जबाजारी असल्याचा दावा अमेरिकेतील व्हॉईसरॉय रिसर्च या शॉर्ट सेलर संस्थेच्या अहवालात करण्यात आला आहे. मात्र, वेदांता समूहाने हे आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
व्हॉईसरॉय रिसर्चने वेदांता समूहाची पालक कंपनी वेदांता रिसोर्स आणि समूहातील मोठी कंपनी वेदांता लिमिटेडबाबत ८५ पानी अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, वेदांताच्या पालक कंपनीवर जास्त कर्ज आहे. संपूर्ण समूहाची रचना ही वित्तीयदृष्ट्या अशाश्वत आणि तडजोडीची असून, यामुळे कर्जदारांना जोखीम निर्माण होऊ शकते.
वेदांता रिसोर्स ही पालक कंपनी परजीवी असून, तिचे स्व:तचे काहीही कामकाज नाही. वेदांता लिमिटेडकडून मिळणाऱ्या गंगाजळीवर पालक कंपनीचे काम सुरू आहे. वेदांता रिसोर्सने आपल्यावरील कर्जाची फेड करण्यासाठी वेदांता लिमिटेड कंपनीतून वारंवार पैसे घेतले आहेत. यामुळे कंपनीकडू गंगाजळी कमी झाली आहे. या लुटीमुळे वेदांता लिमिटेडचे मूल्य कमी होत आहे. याच कंपनीच्या बळावर कर्जदारांनी समूहाला कर्जे दिली आहेत.
या अहवालावर वेदांता समूहाने म्हटले आहे की, हा अहवाल खोडसाळपणाचा प्रकार आहे. त्यातील माहिती चुकीची आणि निराधार आहे. समूहाची पत ढासळावी, यासाठी हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. आमच्याशी कोणताही संपर्क न करता हा अहवाल जाहीर करण्यात आला. केवळ खोटा प्रचार करणे हाच अहवालामागील हेतू आहे. सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेली माहितीच पुन्हा अहवालात दिली असून, केवळ त्याला अतिरंजित स्वरूप देण्यात आले आहे. या अहवालाच्या आधारे बाजारपेठेत अस्थिरता निर्माण करून नफा कमाविण्याचा उद्देश आहे.
अवाजवी भांडवलाचे प्रकल्प
वेदांता लिमिटेडकडून अवाजवी भांडवलाचे प्रकल्प सुरू केले जातात. त्यातून भांडवलाची उभारणी केली जाते. हे भांडवल पुढे पालक कंपनीला कर्जाच्या फेडीसाठी उपलब्ध करून दिले जाते. समूहाकडून मालमत्तांचे मूल्य फुगविण्यात आले असून, उपकंपन्यांच्या खर्चाचा वापर करून नफा वाढविला जात आहे. अब्जावधी डॉलवरचा खर्च ताळेबंदात आणि आर्थिक अहवालात समूहाने दाखविलेला नाही. वेदांता समूहाचे प्रसासन अपयशी ठरले असून, ते व्यवस्थापनापासून लेखापरीक्षणाच्या पातळीवर आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वार्षिक सभेआधी अहवालाचा मुहूर्त
वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अगरवाल हे वेदांता लिमिटेडच्या भागधारकांची वार्षिक ससर्वसाधारण सभा घेण्याच्या एक दिवस आधी हा अहवाल जाहीर करण्यात आला. याबाबत वेदांता समूहाने प्रश्न उपस्थित केले आहे. समूहाने म्हटले आहे की, अहवालाची वेळ ही संशय़ निर्माण करणारी आहे. आमच्या पुढील वाटचालीला रोखण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. आमच्या भागधारकांना अशा गोष्टी ओळखता येतात.