मुंबई : जिओब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने मंगळवारी पाच इंडेक्स फंडांची घोषणा केली आहे. हे पाचही प्रस्तावित फंड हे निष्क्रिय व्यवस्थापन धाटणीचे इंडेक्स फंड आहेत. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (जेएफएसएल) आणि अमेरिकी कंपनी ब्लॅकरॉक यांच्यातील ५०:५० संयुक्त भागीदारीतून  जिओब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटची स्थापना करण्यात आली आहे.

 जिओब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटचे हे पाच नवीन फंड (एनएफओ) ५ ऑगस्ट २०२५ पासून खुले झाले असून येत्या १२ ऑगस्ट २०२५ रोजी बंद होतील, असे जिओब्लॅकरॉकने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. भारतीय गुंतवणूकदारांना विविधता, खर्च कार्यक्षमता, विश्वासार्हता, पारदर्शकता आणि डिजिटली सक्षम गुंतवणूक पर्यय प्रदान करण्याच्या संस्थेच्या ध्येयातील हा एक महत्त्वाचा क्षण आहे, असे त्यात म्हटले आहे.

पाच इंडेक्स फंडांमध्ये निफ्टी ५० इंडेक्स फंड, निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स फंड आणि निफ्टी ८-१३ वर्षांचा जी-सेक इंडेक्स फंड यांचा समावेश आहे. हे फंड पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आणि त्यांच्या विद्यमान पोर्टफोलिओचे आकारमान वाढवण्याचा विचार करणाऱ्या अनुभवी गुंतवणूकदारांना परवडणारे गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देतील, असे त्यात म्हटले आहे.

या आधी जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंटने त्यांच्या पहिल्यावहिल्या योजनांच्या ७ जुलै रोजी नवीन फंड प्रस्ताव (एनएफओ) बंद झाल्याची घोषणा केली, ज्यातून एकूण १७,८०० कोटी रुपये गुंतवणूक गोळा केली गेली आहे. जिओब्लॅकरॉक ओव्हरनाईट फंड, जिओब्लॅकरॉक लिक्विड फंड आणि जिओब्लॅकरॉक मनी मार्केट फंड अशा या तीन रोखेसंलग्न म्युच्युअल फंड योजनांमधून हा निधी उभारण्यात आला आहे. तीन दिवस सुरू राहिलेल्या ‘एनएफओ’ला ९० हून अधिक संस्थात्मक गुंतवणूकदार आणि ६७,००० हून अधिक किरकोळ गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद मिळाल्याचे फंड घराण्याकडून सांगण्यात आले.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि अमेरिकेतील महाकाय वित्तीय समूह असलेला ब्लॅकरॉक यांच्यातील संयुक्त समान भागीदारीतील उपक्रम असलेल्या जिओ ब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने विद्यमान वर्षात जून महिन्यात कामकाज सुरू केले. सीड स्वामिनाथन हे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आता त्यांच्यासह जिओ ब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंटच्या नेतृत्वदायी संघामध्ये मालमत्ता व्यवस्थापन अनुभव, डिजिटल नवोन्मेष आणि ग्राहककेंद्री उत्पादन विकसन यातील तज्ज्ञतेला एकत्र आणले गेले आहे.

जिओ ब्लॅकरॉकने अमित भोसले यांना मुख्य जोखीम अधिकारी, अमोल पै यांना मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आणि बिरजा त्रिपाठी यांना उत्पादन प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे.