Why You Need a PAN Card Key Uses and Benefits: आधार कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदान कार्ड, जन्माचा दाखला या कागदपत्रांप्रमाणे पॅन कार्ड (पर्मनंट अकाऊंट नंबर) हे देखील महत्त्वाचे कागदपत्र आहे. आता या पॅन कार्डचा आपल्याला कसा आणि कोणत्या बाबींमध्ये फायदा होतो हे सविस्तर जाणून घेऊ..
प्राप्तीकर विभागाकडून भारतीय करदात्यांना पॅनकार्ड दिले जाते. आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. व्यक्ती व संस्थांच्या करासंबंधित माहिती पॅनकार्डवर जो दहा अंकी अल्फान्युमरिक कोड असतो, त्यामध्ये नोंदवली जाते. याद्वारे एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेच्या आर्थिक व्यवहाराची माहिती सरकारपर्यंत पोहोचवण्यात मदत होते.
पॅन कार्डचा उपयोग काय आहे?
१. आर्थिक व्यवहार
आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड हे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहारांसाठी प्राथमिक दस्तऐवज म्हणून पॅन कार्डचा उपयोग होतो. बँक खाते उघडणे आणि व्यवसाय नोंदणी करणे यांसारख्या विविध आर्थिक कामांसाठी तुमच्याकडे पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.
- बँक खाते उघडण्यासाठी : जर तुम्हाला नवीन बँक खाते उघडायचे असेल तर तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. चालू खाते तसेच बचत खाते कोणत्याही खासगी, सार्वजनिक किंवा सहकारी बँकेत तुम्ही हे खाते उघडत असाल, तर तुमच्याकडे पॅन कार्ड असणे अनिवार्य आहे.
- क्रेडिट किंवा डेबिट कार्डसाठी अर्ज करणे : कोणत्याही बँकेत किंवा वित्तीय संस्थेत डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना तुमच्या पॅन कार्डसंबंधित संपूर्ण माहिती देणे, नियमांनुसार बंधनकारक आहे. जर हा निकष पूर्ण झाला नाही तर बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड जारी करत नाही.
- कर्ज घेण्यासाठी : तुम्हाला कर्ज घेण्यासाठीदेखील पॅन कार्डची आवश्यकता आहे. कर्ज घेण्यासाठी अर्ज करताना पॅन कार्डचे तपशील देणे महत्त्वाचे आहे. बँक तसेच ज्या संस्था कर्ज देणार आहेत, त्यांच्याकडे तुमच्या पॅन कार्डचे तपशील असणे आवश्यक आहे. शैक्षणिक कर्जापासून ते वैयक्तिक कर्जापर्यंत सर्व प्रकारची कर्जे मंजूर होण्यासाठी पॅन कार्डचे तपशील महत्त्वाचे ठरतात.
- रोख ठेवी (Cash Deposits) : आरबीयआय (RBI)च्या नियमांनुसार, जर तुम्हाला एकाच वेळी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम रोख ठेवत असाल, तर तुम्हाला तुमच्या पॅन कार्डची माहिती देणे आवश्यक आहे.
- मुदत ठेवी (Fixed Deposits) : जर तुम्ही बँकेत ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम मुदत ठेवी (FD)मध्ये गुंतवणार असाल, तर तुम्हाला तुमच्या पॅन कार्डचे तपशील देणे गरजेचे आहे.
- आयटी रिटर्न भरणे : आयटी रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
- परकीय चलन (Foreign Exchange) : जर तुम्ही परदेशात प्रवास करत असाल आणि तुम्हाला भारतीय चलन परकीय चलनात रूपांतरित करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या पॅन कार्डची माहिती बँक, मनी एक्स्चेंज ब्युरो किंवा ज्या संस्थेत तुम्ही चलन रुपांतरीत करणार आहात तिथे देणे अनिर्वाय आहे.
२. वाहन खरेदी करणे किंवा विकणे
जर तुम्हाला ५,००,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे वाहन खरेदी करायचे असेल किंवा विकायचे असेल, तर व्यवहार करताना तुम्हाला तुमचे पॅन कार्ड तपशील देणे अनिर्वाय आहे.
३. दागिने खरेदी करण्यासाठी
जर तुम्ही ५,००,००० रुपयांपेक्षा अधिक किमतीचे दागिने विकत घेत असाल, तर त्यावेळी तुम्ही पॅन कार्डचे तपशील सादर करणे अनिर्वाय आहे.
४. ओळखीचा पुरावा
- ओळखीचा पुरावा सादर करण्यासाठी पॅन कार्डचा वापर होतो. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या परीक्षेसाठी अर्ज करत असाल तर तिथे आधार कार्डप्रमाणेच तुम्ही पॅनकार्डचा वापर हा ओळखीचा पुरावा म्हणून करू शकता.
- फोन कनेक्शन आणि गॅस कनेक्शनसाठी पॅन कार्ड वापरता येते.
- पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसेन्स, वीज कनेक्शन इत्यादींसाठी अर्ज करताना ओळखीचा पुरावा म्हणूनदेखील याचा वापर केला जाऊ शकतो.
- वयाचा पुरावा म्हणूनदेखील पॅन कार्डचा उपयोग होतो.
- पत्त्याचा पुरावा म्हणून पॅन कार्ड वापरता येते.
५. मालमत्ता खरेदी करणे
मालमत्ता खरेदी-विक्री करणे तसेच भाड्याने देणे-घेणे या व्यवहारातदेखील पॅन कार्डचे तपशील देणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, एखादी मालमत्ता खरेदी करताना, खरेदी करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या व्यक्तीचे पॅन कार्डचे तपशील विक्री करारावर नमूद करणे आवश्यक आहे.
६. म्युच्युअल फंड
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुक करताना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी पॅन कार्ड फायदेशीर ठरते.
७. विमा पेमेंट (Insurance Payments)
प्राप्ती कर विभागाच्या नियमांनुसार, दरवर्षी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त विम्याची रक्कम भरताना पॅन कार्डची माहिती देणे आवश्यक आहे.
आता जसा व्यक्तीला पॅन कार्डचा आर्थिक तसेच इतर बाबींमध्ये उपयोग होतो, तसाच सरकारलादेखील पॅनकार्डचा उपयोग होतो. आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणे, कर महसूल निश्चित करणे, कर आकारणीचे दर निश्चित करण्यासाठी सरकारला पॅन कार्डचा उपयोग होतो.