मुंबई : सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी १० टक्क्यांनी कमी होऊन, १३४.९ टनांवर सीमित राहिली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत १४९.७ टन मागणी नोंदविली गेली होती, अशी माहिती जागतिक सुवर्ण परिषदेने (डब्ल्यूजीसी) गुरुवारी सांगितले.
जागतिक पातळीवर वाढत्या अनिश्चततेमुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. सोन्याने प्रति तोळा एक लाख रुपयांचा अभूतपूर्व टप्पाही ओलांडला होता. परिणामी मूल्याच्या बाबतीत, कॅलेंडर वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी ३० टक्क्यांनी वाढून १,२१,८०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी २०२४ च्या याच कालावधीत ९३,८५० कोटी रुपयांवर मर्यादित होती, असे डब्ल्यूजीसीने अहवालात म्हटले आहे.
सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे देशातील दागिन्यांच्या खरेदीवर परिणाम झाला आहे. वर्ष २०२४ च्या याच तिमाहीत ती १०६.५ टनांच्या तुलनेत १७ टक्क्यांनी घसरून ८८.८ टनांपर्यंत खाली आली आहे. मात्र, तरी खरेदी झालेल्या दागिन्यांचे मूल्य २०२४ च्या एप्रिल-जून तिमाहीत ६६,८१० कोटी रुपो होते, ते आता २० टक्क्यांनी वाढून ८०,१५० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
गेल्या वर्षीच्या १४९.७ टनांच्या तुलनेत भौतिक सोन्याच्या मागणीत १० टक्क्यांनी घट होऊन ती १३४.९ टन झाली असली तरी, या मागणीचे मूल्य ३० टक्क्यांनी वाढले आहे, असे डब्ल्यूजीसीचे प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी – भारत सचिन जैन यांनी सांगितले. हे सोन्याच्या वाढत्या किमतीचे प्रतिबिंब आहे. सोन्याची सरासरी जागतिक तिमाही किंमत ३,२८०.४ अमेरिकी डॉलर प्रति औंस (२८.३४ ग्रॅम) पातळीवर पोहोचली आहे आणि देशांतर्गत किंमती कर वगळता प्रति १० ग्रॅम ९०,३०६.८ रुपयांवर चढल्या आहेत.
जानेवारी ते जून या कालावधीत एकूण सोन्याची मागणी अंदाजे २५३ टन राहिली आहे. संपूर्ण २०२५ सालातील मागणी परिणामी ६०० टन ते ७०० टन दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आगामी काळात किंमत स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. किमती स्थिरावल्यास मागणी ७०० टन राहील. तथापि, जर किंमती वाढत्या राहिल्यास मागणीत लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.
गुंतवणूक म्हणून ओढा…
गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीमध्ये ७ टक्के वाढ होऊन ४६.१ टनांपर्यंत पोहोचली आहे आणि मूल्यात ५४ टक्के वाढ होऊन ४१,६५० कोटी रुपये झाले आहेत. ही आकडेवारी दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून सोन्याबद्दल ग्राहकांमध्ये वाढती धोरणात्मक अधोरेखित करते. पुरवठ्याच्या बाजूने, भारतात सोन्याची आयात ३४ टक्क्यांनी कमी होऊन १०२.५ टन झाली आहे, जी २०२४ मध्ये याच कालावधीत १५० टन होती, असे जैन म्हणाले.
डब्ल्यूजीसीच्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या तिमाहीत सोन्याचा पुनर्वापर १ टक्क्यांनी वाढून २३.१ टन झाला आहे, जे २०२४ च्या याच कालावधीत २ टन होता.
जागतिक मागणी १,२४९ टनापुढे
एप्रिल-जून तिमाहीत जागतिक सोन्याची मागणी ३ टक्क्यांनी वाढून १,२४९ टन झाली आहे. वाढत्या भू-राजकीयतणावामुळे आणि किमत वाढीमुळे मागणी टिकून राहिली. जागतिक सोन्याच्या ईटीएफची मागणी ३९७ टनांवर पोहोचली, जी २०२० नंतरच्या पहिल्या सहामाहीतील सर्वाधिक आहे. मुख्यतः सूचिबद्ध फंडांनी ७० टनांचे यात योगदान दिले आहे. दरम्यान, एकूण बार आणि नाण्यांच्या गुंतवणुकीतही वार्षिक आधारावर ११ टक्क्यांनी वाढ झाली आणि त्यात ३०७ टनांची भर पडली. चिनी गुंतवणूकदारांनी ११५ टनांपर्यंत, तर भारतीय गुंतवणूकदारांनी त्यांच्या साठ्यात दुसऱ्या तिमाहीत एकूण ४६ टन भर घातली आहे.