Cars and Bikes New Rates: वस्तू व सेवा करातील (जीएसटी २.०) नवी द्विस्तरीय दररचना आजपासून (२२ सप्टेंबर) लागू होत आहे. अप्रत्यक्ष करातील ही सुधारणा म्हणजे ‘बचत उत्सव’ असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी कालच सांगितले होते. या सुधारणांचा फायदा सामान्य जनता आणि मध्यम वर्गीयांना होणार आहे. त्याशिवाय दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. ३५० सीसी पर्यंत इंजिन असलेल्या दुचाकींवर, लहान वाहनांवर कर सवलत मिळणार आहे.

जीएसटी दर कपातीच्या घोषणेनंतर, महिंद्रा, मारुती सुझुकी, जीप आणि टाटा मोटर्ससह अनेक कार कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती कमी केल्या. पूर्वी २८ टक्के कर श्रेणीत असलेली वाहने आता १८ टक्क्यांच्या कर श्रेणीत आली आहेत. नवीन सुधारणांनुसार ३५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाकी आणि मोठ्या आलिशान कार ४० टक्के कर श्रेणीत मोडल्या जाणार आहेत. तर इलेक्ट्रिक वाहने ५ टक्क्यांच्या कर श्रेणीत असतील.

छोट्या वाहनांवर कमी कर

१२०० सीसीपर्यंत पेट्रोल इंजिन आणि १५०० सीसीपर्यंत डिझेल इंजिन असलेल्या तसेच ४००० मिमी पेक्षा जास्त लांबी नसलेली चारचाकी वाहने आता लहान कार म्हणून वर्गीकृत केल्या जातील. या वाहनांवर पूर्वीच्या २८ टक्के ऐवजी १८ टक्के जीएसटी कर आकारला जाईल. याचा अर्थ अल्टो आणि आय१० सारखे मॉडेल अधिक परवडणारे ठरतील.

मोठ्या वाहनांवर अधिक कर

जे चारचाकी वाहन लहान कार म्हणून वर्गीकृत केल्या जाणार नाहीत, त्या वाहनांवर ४० टक्के कर आकारला जाईल. यापूर्वी या वाहनांवर २८ टक्के कर लावला जात होता. तसेच २२ टक्क्यांपर्यंत उपकर लावला जात होता. अशाप्रकारे आलिशान वाहनांवर ५० टक्क्यांपर्यंत कर लावला जात होता. आता आलिशान वाहनांवर फक्त ४० टक्के जीएसटी एवढाच एक कर असेल.

टाटा मोटर्स

टाटा मोटर्सने जीएसटी कर रचनेत बदल झाल्यानंतर आपल्या वाहनांच्या किमतीमध्ये १ लाख ५५ हजार रुपयांची घट केली आहे. टियागोच्या (Tiago) किमतीत ७५,००० रुपयांची कपात केली आहे. तर टिगोच्या (Tigo) किमतीमध्ये ८० हजारांची कपात केली आहे. अल्ट्रोझ, पंच, नेक्सन, कर्व्ह, हॅरियर आणि सफारी या वाहनांच्या किमतीतही घट करण्यात आली आहे.

महिंद्रा

जीएसटी कमी केल्याचा फायदा एसयूव्ही वाहन उत्पादक महिंद्रालाही होणार आहे. महिंद्राने त्यांच्या प्रमुख वाहन मॉडेलच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. महिंद्राच्या बोलेरो, बोलेरो निओ, एक्सयूव्ही ३एक्सओ आणि थार २डब्ल्यूडी (डिझेल) या कार आता १८ टक्के कर श्रेणीत येतील. तर उर्वरित वाहनांवर ४० टक्के कर आकारला जाईल.

मारुती सुझुकी

मारुती सुझुकीनेही आपल्या वाहनांच्या किमती कमी केल्या आहेत. एंट्री-लेव्हल अल्ट के१० ची किंमत १,०७,६०० ने कमी होऊ ३,६९,९०० रुपये इतकी झाली आहे. ग्रँड विटारादेखील स्वस्त झाली असून त्याची किंमत आता १०,७६,५०० रुपये एवढी आहे.