Nirmala Sitharaman Appeals Indian Companies: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी म्हटले की, सरकारने हाती घेतलेल्या धोरणांचा आणि सुधारणांचा फायदा घेण्यास, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास आणि क्षमता वाढविण्यास भारतीय कंपन्यांनी मागेपुढे पाहू नये. सीतारमण यांनी भारतीय कंपन्यांना तरुणांना कौशल्य शिक्षण देण्यासाठी सरकारसोबत भागीदारी करण्यास आणि केवळ अर्थसंकल्पापूर्वीच नव्हे तर वर्षभर सरकारसोबत काम करण्याचे आवाहन केले.
कोणताही संकोच न करता…
इंडियन फाउंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंटच्या कार्यक्रमात बोलताना सीतारमण म्हणाल्या की, भारतीय कंपन्यांना कोणताही संकोच न करता धोरणात्मक वातावरणाचा फायदा घेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी असे नमूद केले की, “२ लाख कोटी रुपयांच्या जीएसटी कपातीसह नवीन सुधारणा खर्च करण्यायोग्य उत्पन्न आणि इंधनाची मागणी वाढवण्यासाठी सज्ज आहेत.”
विकसित राष्ट्र बनण्याच्या…
व्यवसाय सुलभता, कर सुधारणा, थेट परकीय गुंतवणुकीचे उदारीकरण आणि एमएसएमईला पाठबळ यावर सरकारचे लक्ष अधोरेखित करताना सीतारमण म्हणाल्या की, “विकसित राष्ट्र बनण्याच्या भारताच्या प्रवासात उद्योगाची भूमिका महत्त्वाची आहे. पायाभूत सुविधांच्या उभारणीपलीकडे जाणारा आणि दर्जेदार उत्पादन व सेवा क्षेत्रातील सुधारणांचा समावेश असलेला दीर्घकालीन विकास दृष्टिकोन आवश्यक आहे.”
देशांतर्गत विकास आणि निर्यातीसाठी प्रचंड मोठ्या संधी
सीतारामन यांच्या आवाहनाला उत्तर देताना, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की, सुधारणांमुळे निर्माण होणाऱ्या संधी, देशांतर्गत विकास आणि निर्यातीसाठी प्रचंड मोठ्या आहेत. सरकारचे नेतृत्व आणि लवचिक पुरवठा साखळींसाठी जागतिक मागणी लक्षात घेता, दीर्घकालीन विकासासाठी भारताला सर्वोत्तम ठिकाण माणून अधिक उद्योजक आणि कॉर्पोरेट्स गुंतवणूक वाढवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जागतिक संस्था आशावादी
दरम्यान, जागतिक संस्था भारतातील खाजगी गुंतवणूक चक्राबद्दल सावधपणे आशावादी आहेत. एस अँड पी ग्लोबलने असा अंदाज वर्तवला आहे की, भारतीय कंपन्या पुढील पाच वर्षांत ८५० अब्ज डॉलर्सपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
क्रिसिलचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ डी.के. जोशी यांनी निरीक्षण केले की, खाजगी गुंतवणूक वाढत असली तरी, बदलती व्यापार धोरणे आणि टॅरिफ यासारख्या जागतिक अनिश्चिततेमुळे ती अद्याप जीडीपी वाढीशी जुळत नाही. याबाबत टाईम्स नाऊच्या वृत्तात उल्लेख करण्यात आला आहे.