जीएसटी परिषदेची ५६ वी बैठक बुधवारी दिल्लीत सुरु झाली. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटीचे आता फक्त दोन स्लॅब असतील. ५ टक्के जीएसटी आणि १८ टक्के जीएसटी. १२ आणि २८ टक्के जीएसटीचा स्लॅब सरकारने संपुष्टात आणला आहे. चारऐवजी दोन टॅक्स स्लॅब आल्याने आता अनेक वस्तू स्वस्त होण्याची चिन्हं आहेत. मात्र चैनीच्या आणि हानीकारक असलेल्या वस्तुंसाठी निराळा टॅक्स स्लॅब आणला गेला आहे जो ४० टक्के इतका आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबाबत घोषणा केली. २२ सप्टेंबरपासून ही कर प्रणाली लागू केली जाणार आहे.

दिल्लीत १० तास चाललेल्या बैठकीत मोठा निर्णय

दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथे बुधवारी झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या मॅरेथॉन बैठकीत कर प्रणालीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल १० तासांपेक्षा जास्त चाललेल्या या बैठकीत १२ टक्के आणि २८ टक्क्यांचे स्लॅब पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार आता ५ टक्के आणि १८ टक्के असे फक्त दोनच स्लॅब राहणार आहेत. केंद्र सरकारच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे व्यापारी तसेच सामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कर सुलभ रचना कशी असेल?

१२ टक्के आणि २८ टक्के जीएसटीचे स्लॅब रद्द.

१२ टक्के जीएसटी असलेल्या ९९ टक्के वस्तूंवर आता ५ टक्केच जीएसटी लागू होणार

२८ टक्के जीएसटी असलेल्या बहुतांश वस्तू १८ टक्के टॅक्स स्लॅबमध्ये समाविष्ट

पान मसाला, तंबाखू यांसारख्या सिन गुड्स आणि लक्झरी गाड्यांवर ४० टक्के जीएसटीचा नवीन स्लॅब प्रस्तावित.

रिफंड प्रक्रिया कशी असेल?

उत्तर : ऑटोमॅटिक रिफंड सिस्टीम लागू होणार.

निर्यातकांसाठी सवलत काय?

उत्तर : रजिस्ट्रेशन कालावधी एक महिना वरून फक्त तीन दिवसांवर आणणण्यात आला. त्याचा फायदा निर्यातकांना होणार आहे.

कपडे व पादत्राणे

२५०० रुपयांपर्यंतच्या वस्तूंवर जीएसटी आता फक्त ५ टक्के असणार आहे. त्यामुळे कपडे आणि पादत्राणे अशा वस्तू स्वस्त होणार आहेत.

कुठल्या दैनंदिन वस्तूंवर सवलत?

पनीर, खाखरा, पोळी, साबण, टूथपेस्ट, शॅम्पू यांसारख्या वस्तूंवरील कर १८ टक्क्यांवरुन वरून ५ किंवा शून्य टक्के करण्यावर चर्चा झाली आहे. यानंतरचा अंतिम निर्णय झाल्यावर या वस्तूंची किंमत कमी होणार.

आरोग्य विमा व जीवन विमा यांवर काय दिलासा?

५ लाख रुपयांपर्यंतच्या हेल्थ पॉलिसी व टर्म इन्शुरन्सवर पूर्ण सूट मिळण्याची शक्यता.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या निर्णयांची घोषणा केली. तज्ज्ञांच्या मते, जीएसटीमधील या मोठ्या बदलांमुळे कररचना अधिक सोपी होईल आणि सामान्य नागरिकांवरचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.