भारतात अलीकडच्या काळात उच्च उत्पन्न करदात्यांची संख्या झपाट्याने वाढलेली दिसत आहे. मर्सिडीज-बेंझ हुरुन इंडिया वेल्थ रिपोर्ट २०२५ नुसार, एक कोटी रुपयांहून अधिकचे वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांची संख्या गेल्या सहा वर्षांत (२०१८-२०२४) जवळपास तिपटीने वाढली आहे. प्राप्तीकर भरणाऱ्या करदात्यांच्या माहितीवरून ही आकडेवारी समोर आली आहे.
हुरुन इंडिया वेल्थ रिपोर्टमध्ये दिलेल्या अधिकृत प्राप्तीकर आकडेवारीनुसार, २०१७-१८ या वर्षात अंदाजे ८१ हजार करदात्यांचे वार्षिक उत्पन्न १ कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. तर २०२३-२४ या वर्षात ही संख्या अंदाजे २.२७ लाखांपर्यंत वाढली. फायनान्शियल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आर्थिक विकास, उद्योजकता आणि इक्विटी मार्केटमध्ये आलेल्या वाढीमुळे भारतातील कोट्यधीशांची संख्या वाढत आहे.
एक कोटींहून अधिकचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी ५ कोटी किंवा १० कोटी किंवा त्याहून अधिक उत्पन्न नोंदवणाऱ्या अतिश्रीमंतांची संख्या मात्र खूपच कमी आहे. याचा अर्थ असा की, कोट्यधीश होणे पूर्वीपेक्षा सोपे झाले असले तरी अतिश्रीमंत वर्गात पोहोचणे हे अजूनही निवडक लोकांनाच शक्य होत आहे.
भारतात कोट्यधीशांचा पूर
हुरुन इंडिया वेल्थ रिपोर्ट २०२५ नुसार, वेगाने संपत्ती निर्माण करणारी अर्थव्यवस्था अशी भारताची ओळख होत चालली आहे. देशात सध्या ८.७१ लाख कोट्यधीश आहेत.
कोट्यधीशांच्या संख्येत वाढ झाली असली तरी अब्जाधीश होण्याचा मार्ग अद्यापही कठीण दिसत आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. फक्त काही मोजक्याच कोट्यधीशांची संपत्ती १ किंवा २ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचते.
