Indian Business Leaders on GST: वस्तू आणि सेवा कर परिषदेची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत सर्व राज्यांच्या सहमतीतून ५ आणि १८ टक्के हे दोनच दररचना यापुढे असतील, असा निर्णय घेण्यात आला. २२ सप्टेंबर म्हणजेच घटस्थापनेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयावर आता भारतीय उद्योगपती राधिका गुप्ता, हर्ष गोयंका आणि आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली असून सदर निर्णयाची स्तुती केली आहे.
एडलवाईस म्युच्युअल फंडच्या सीईओ राधिका गुप्ता यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, अत्यंत महत्त्वाच्या वेळी हे प्रगतीशील पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे मागणी वाढीस मदत होईल. जग जेव्हा आपल्याला एकटे पाडण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा आपण स्वतःला आणखी जोरकसपणे पुढे आणले पाहिजे.
महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही या निर्णाचे स्वागत केले. “आम्ही आता लढायला सुरुवात केली आहे. वेगाने केलेल्या सुधारणा या मागणी आणि गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या आहेत. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळून भारताचा आवाज जगभरात उंचावला जाईल. स्वामी विवेकानंद यांचे प्रसिद्ध वाक्य लक्षात ठेवू. ते म्हणाले, ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका.’ त्यामुळे आणखी सुधारणांची गरज आहे.
उद्योगपती हर्ष गोयंका यांनीही गुप्ता आणि महिंद्रा यांच्याप्रमाणे या निर्णयाचे स्वागत केले. हा निर्णय जनतेसाठी दिवाळीची भेट आहे, असे ते म्हणाले. “प्रत्येक भारतीयासाठी दिवाळीची ही मोठी भेट आहे. दैनंदिन आवश्यक गोष्टी जसे की, आरोग्य, शिक्षण आणि कृषी उत्पादनांवरील जीएसटी कमी केला आहे. स्वस्त किराणा माल, परवडणारे शिक्षण आणि शेतकऱ्यांना दिलासा, असे नव्या रचनेचे वर्णन करता येईल”, असेही गोयंका म्हणाले.
ही पुढील पिढीची सुधारणा असून यातून दुहेरी फायदा होणार आहे. आपल्या जीवनशैलीत बदल होणार असून अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असेही ते म्हणाले.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोणती घोषणा केली?
जीएसटी परिषदेची ५६ वी बैठक बुधवारी संपन्न झाली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १२ आणि २८ टक्के हे दोन कर दराचे टप्पे रद्दबातल केल्याची घोषणा केली. यामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या नित्य वापराच्या वस्तू, केश तेल, साबण अशा अनेक वस्तू आता स्वस्त होणार आहेत.