Indian Electronics Export: भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या आयफोनच्या उत्पादनामुळे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र भारतातून होणाऱ्या निर्यातीमध्ये दुसऱ्या स्थानी पोहचू शकते. ट्रम्प यांनी रशियन कंपन्यांवर लादलेल्या या निर्बंधांमुळे भारताच्या कच्च्या तेलाची आयातही मंदावण्याची शक्यता आहे. याचा परिणाम पेट्रोलियम क्षेत्राच्या निर्यातीवरही होण्याची शक्यता आहे.
ईकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे रशियाकडून कच्चे तेल आयात करणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या खरेदीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पेट्रोलियम क्षेत्राला निर्यातीत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र मागे टाकेल असा अंदाज आहे.
वाणिज्य मंत्रालयाच्या निर्यातीच्या सहा महिन्यांच्या आकडेवारीवरुन असे दिसून येते की, इलेक्ट्रॉनिक्सची निर्यात ४२ टक्क्यांनी वाढून २२.२ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. यात आयफोन्सच्या निर्यातीचा वाटा जवळपास निम्मा आहे.
आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत इलेक्ट्रॉनिक्सने निर्यातीत देशातील तिसरे सर्वात मोठे आणि सर्वात वेगाने विस्तारणारे क्षेत्र म्हणून स्थान मिळवले आहे. तज्ञांनी ईकॉनॉमिक टाईम्सला सांगितले की, रशियन तेल खरेदीवरील मर्यादांमुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र निर्यातीत दोन वर्षांत अभियांत्रिकीनंतर दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकते.
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राने रत्ने व दागिने तसेच रसायने या क्षेत्रांना मागे टाकत निर्यातीत तिसरे स्थान मिळवले होते. याआधी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राने २०२२ मध्ये सातव्या स्थानावरून औषधे व फार्मास्युटिकल्स आणि रेडीमेड गारमेंट्स या क्षेत्रांना मागे टाकत वरच्या पातळीवर झेप घेतली होती. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र आर्थिक वर्ष २०२२ दरम्यान निर्यात क्रमवारीत सातव्या स्थानावर होते.
मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात निर्यातीत इलेक्ट्रॉनिक्स हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र ठरले. त्यानंतर या क्षेत्राची वाढ अधिक वेगाने झाली आहे. आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत सर्व ३० निर्यात क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक्सने वाढीचा सर्वाधिक दर गाठला आहे.
दुसरीकडे, पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात १६.४ टक्क्यांनी घटून ३६.६ अब्ज डॉलर्सवरून ३०.६ अब्ज डॉलर्सवर आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पेट्रोलियम निर्यातीत सातत्याने घट दिसून आली आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ९७.४ अब्ज डॉलर्सची पेट्रोलियम निर्यात आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ६३.३ अब्ज डॉलर्सवर आली आहे.
