Accenture layoffs : आयटी क्षेत्र हे प्रत्येक देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्वाचं मानलं जातं. कारण लाखो तरुण-तरुणी आयटी क्षेत्रात नोकरी करत असतात. मात्र, सध्या आयटी क्षेत्रात सर्वत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI (एआय)चा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे, पण याचा फटका लाखो तरुण-तरुणींना बसत असल्याची परिस्थिती आहे. एआय तंत्रज्ञान अनेकांसाठी सोयीचं असलं तरी यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार असल्याचा दावा केला जात आहे.
गेल्या काही दिवसांतील आपण आयटी क्षेत्रातील घडामोडी पाहिल्या तर अनेक आयटी कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. मागच्या तीन महिन्यांत आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या अॅक्सेंचरने तब्बल ११ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याचंही वृत्त समोर आलं होतं.त्यानंतर आता अॅक्सेंचर संदर्भात आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे.
अॅक्सेंचर कंपनीने गेल्या ३ वर्षांत आपल्याच कंपनीतील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यासाठी तब्बल २ अब्ज डॉलर्स खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. या कंपनीने या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम का खर्च केली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, अलिकडच्या काळात ऑटोमेशन आणि बदलत्या उद्योगांच्या मागण्यांमुळे कंपनी मोठ्या प्रमाणात पुनर्रचना करत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर कंपनी अशा प्रकारचा खर्च करत आहे.
दरम्यान, अॅक्सेंचर कंपनीने गेल्या तीन वर्षांत व्यवसाय ‘ऑप्टिमायझेशन’वर तब्बल २ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केले आहेत. त्यामध्ये बराचसा भाग कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबाबत खर्चासाठी दिला गेल्याचं वृत्तात म्हटलं आहे. कंपनीने गेल्या तीन महिन्यांत ११,००० पेक्षा जास्त कामगारांना कामावरून काढून टाकलं आहे.
वृत्तानुसार, ऑगस्ट २०२५ च्या अखेरीस कंपनीची जागतिक कर्मचारी संख्या ७,७९,००० पर्यंत कमी झाली, जी तीन महिन्यांपूर्वी ७९१,००० होती. तसेच गेल्या तिमाहीत संबंधित खर्च ६१५ दशलक्ष डॉलर्स पर्यंत पोहोचला, तसेच चालू तिमाहीत अतिरिक्त २५० दशलक्ष डॉलर्स अपेक्षित आहे. दरम्यान, कंपनीच्या पुनर्रचनेनंतर कंपनीची शेवटी १ अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त बचत होईल असा अंदाज आहे. आता हे तपशील अलीकडच्या स्टेटमेंट्स आणि फाइलिंगमध्ये नोंदवले गेले आहेत. मात्र, अॅक्सेंचर कंपनीने सूचित केलं की ही प्रक्रिया नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.
अॅक्सेंचर कंपनीच्या पुनर्रचनाचं नेतृत्व करताना कंपनीच्या सीईओ जूली स्वीट यांनी नवीन तांत्रिक वास्तवांशी जुळवून घेण्याच्या संदर्भात भर दिला. त्यांनी म्हटलं की, “आम्ही एक उदिष्ट ठेऊन वेळेवर पुढे जात आहोत. जिथे पुनर्कौशल्य हा एक व्यवहार्य मार्ग नाही, तिथे आम्ही लोकांना काढून टाकण्याचा कठीण निर्णय घेत आहोत. तसेच कंपनीची रणनीती कर्मचाऱ्यांच्या र्कौशल्याला प्राधान्य देते. परंतु सर्व कर्मचारी विकसित होत असलेल्या व्यवसायाच्या गोष्टीसांठी आवश्यक असलेल्या भूमिकांमध्ये बदल करू शकत नाहीत हे मान्य करते.”
दरम्यान, अॅक्सेंचरने त्यांचे कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचं उद्दिष्ट का ठेवलं? यामागची अनेक कारणे असू शकतात. मात्र, इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एआय खरोखरच त्यापैकी एक आहे.कंपनीबरोबर काम करणाऱ्या आणि नाव न सांगण्याच्या अटीवर एका व्यवसाय विश्लेषकाच्या मते अनेक प्रकल्प पूर्णपणे थांबले आहेत आणि अॅक्सेंचरमधील अनेक कर्मचारी प्रकल्प मिळवू पाहत आहेत. तसेच आणखी एक अॅक्सेंचर कर्मचारी म्हणतो की “कंपनी एआयमध्ये खूप गुंतवणूक करत आहे, परंतु त्याच वेळी बरेच लोक बेंचवर आहेत.”