प्रमोद पुराणिक

नटराजन चंद्रशेखरन यांना टाटा उद्योग समूहात एन. चंद्रा या नावाने ओळखले जाते. २ जून १९६३ ला तमिळनाडूमध्ये नमक्कल मोहनूर येथे एक शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा टाटा उद्योग समूहात सर्वोच्च पदावर पोहोचतो. हे आश्चर्य वाटावे असेच असले तरी, प्रयत्न आणि नशीब या दोन्हींचा तो संगम आहे, हेही लक्षात घेतले जावे.

शिक्षण पूर्ण करून १९८७ ला त्यांनी एक ट्रेनी म्हणून टीसीएसमध्ये (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) सुरुवात केली आणि वयाच्या ४६ व्या वर्षी ते या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी – सीईओ झाले. आणि त्यानंतर २०१७ मध्ये एक चमत्कार घडला. प्रसंग असे घडत गेले की, टाटा सन्स या कंपनीचे एन. चंद्रा अध्यक्ष झाले. टाटा सन्सच्या आयुष्यात जातीने पारशी नसलेले सर्वात तरुण नटराजन हे अध्यक्ष होऊ शकले. वस्तुत: टाटा उद्योगसमूहातच असे होणे शक्य आहे. हे घडण्याचे महत्त्वाचे कारण, म्हणजे त्या अगोदर रतन टाटा आणि मिस्त्री या दोघांचा झालेला संघर्ष हे आहे, पण त्याच्या खोलात जाणे आपण तूर्त बाजूला ठेवू. अध्यक्षपदाची सूत्रे हाती येऊन सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. एन. चंद्रा यांच्याबाबतीत आज आपण असे म्हणू शकतो की, त्यांनी त्यांची निवड समर्पक ठरवणारे कर्तृत्व सिद्ध केले आहे.

आणखी वाचा-बाजारातली माणसं: संघर्ष हाच जीवनमंत्र- नीलेश साठे

उद्योग चालवताना भावना बाजूला ठेवायच्या असतात असे म्हटले जाते. फक्त व्यवहार पाहिला जावा, असेही नेहमी सांगितले जाते. परंतु १९३२ साली टाटांनी सुरू केलेली एअर इंडिया या कंपनीतून अचानकपणे पायउतार व्हावे लागून, टाटांना या कंपनीलाही मुकावे लागले होते. तो कटू इतिहास पुन्हा उगाळण्यात काहीही अर्थ नाही. परंतु २०२२ मध्ये टाटा उद्योग समूहात एअर इंडिया ही कंपनी पुन्हा आली आणि जुनी जखम भरली गेली. हेसुद्धा सहजपणे घडून आलेले नाही. त्यामध्ये अनेक अडथळे येत होते. एअर इंडियाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. टाटांनी ही कंपनी घेऊ नये. तो पांढरा हत्ती ठरेल. एअर इंडियाची विक्री करायची की नाही, यावर खुद्द सरकारच्या भूमिकादेखील वेळोवेळी बदलत होत्या. चर्चा चालू असतानाच सरकारचा रिमोट कंट्रोल म्हणून ज्यांना ओळखले जाते त्यांनी फक्त एक विधान केले – प्रत्येक देशाची स्वतःची एक विमान सेवा असते. हे वाक्य म्हणजे पुरेसा इशारा होता. एअर इंडियाची विक्री प्रकिया थांबली.

ही प्रकिया थांबली म्हणून एन. चंद्रा नाराज झाले नाहीत तर त्यांनी सरकारकडे पाठपुरावा चालूच ठेवला. आणि मग २०२२ म्हणजे ९० वर्षांनंतर एअर इंडिया पुन्हा टाटांकडे आली. प्रत्येक कथानकाला उप-कथानके असतात. या ठिकाणी आपले मुख्य लक्ष केंद्रित झाले पाहिजे ते म्हणजे एन. चंद्रा यांनी सहा वर्षांत काय केले? तर, एन. चंद्रा यांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या घेतल्या त्या वेळेआधी ती पूर्ण करून दाखवल्या.

आणखी वाचा-बाजारातील माणसं : सुनील सुब्रमणियम… म्युच्युअल फंड उद्योगाची मुलुखमैदान तोफ

बाजारात कंपन्यांचे ताळेबंद वाचायचे असतात. अभ्यास करायचा असतो आणि या कंपन्या चालवणारे कुठे काय बोलतात, त्यावरून त्यांचे काय धोरण सांगितले जाते त्याकडेसुद्धा लक्ष द्यावे लागते. म्हणून शेअर बाजार हा आकड्यांचा कंटाळवाणा विषय राहात नाही. टाटा कंपन्यांचे ताळेबंद भक्कम करायचे हे मुख्य ध्येय ठरवून या उद्योग समूहात काही कंपन्यांचे विलीनीकरण, एका कंपनीची एक डिव्हिजन दुसऱ्या कंपनीकडे सोपवणे, काही व्यवसाय क्षेत्रात मोठे स्थान मिळवता आले नाही म्हणून निराश होण्यापेक्षा त्या उद्योगातून बाहेर पडणे, असे अनेक निर्णय चंद्रा यांना घ्यावे लागले. हे अत्यंत कठीण काम होते. हे चालू असतानासुद्धा वेळात वेळ काढून चंद्रा यांनी अनेक पुस्तके लिहिली. काही वेळा काही कंपन्यांचे अध्यक्ष दुसऱ्यांकडून पुस्तके लिहुन घेतात आणि त्यावर लेखक म्हणून स्वतःचे नाव टाकतात, असे प्रकार चंद्रा यांनी केले नाहीत.

फक्त वाहन उद्योगाचा विचार केला, तर एन. चंद्रा यांनी टाटा मोटर्स ही विद्युत वाहने निर्माण करण्यात इतर सर्व स्पर्धकांच्या पुढे राहील हे घोषित केले आणि करूनही दाखवले. टाटा कंपन्यांचे ताळेबंद भक्कम करणे ही योजना राबवली. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स या कंपनीकडे काही उत्पादनांचे केंद्रीकरण करून, तीअंतर्गत काही नवे व्यवसाय सुरू केले. याचे फलित सर्वांसमक्ष आहेच. २०२३ सालात बाजारातील बड्या उद्योग घराण्यांमध्ये गुंतवणूकदारांच्या झोळीत सर्वाधिक लाभ टाटा उद्योग समूहानेच दिला. रतन टाटा यांच्याकडून काय शिकलात? या प्रश्नाला त्यांचे एकाच शब्दातील उत्तर होते. ते म्हणजे ‘माणुसकी.’

बाजारात जुने गुंतवणूकदार विशेषत: आजसुद्धा पारशी गुंतवणूकदार टाटा उद्योग समूहाचे शेअर्स वर्षानुवर्षे सांभाळून ठेवतात. टाटा स्टीलमध्ये चढ-उतार होणार हे त्यांनी गृहीतच धरलेले असते. तरुण गुंतवणूकदार टाटा उद्योग समूहाबाबत फारसा उत्साही नाही, किंबहुना टीका करण्यात अग्रेसर असतो. मात्र गेल्या काही वर्षांत टाटा उद्योगातील कंपन्यांचे महत्त्व तेही जाणू लागले आहेत.

आणखी वाचा-बाजारातली माणसं- टेम्पलटन ते कोटक म्युच्युअल फंड… उन्नत प्रवास : निलेश शहा

टाटांनी २५ वर्षे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या शेअर्सची बाजारात नोंदणी करायची नाही असे ठरविले होते. २००४ ला शेअर्सची प्रारंभिक विक्री झाली. टाटांनी कंपनीचे एक विशिष्ट बाजार मूल्य अपेक्षिले होते. २० हजार कोटी रुपये असे काही मुरलेल्या गुंतवणूकदारांनी टाटांना सांगितले. प्रत्यक्षात बाजाराने तुमच्या कंपनीचे बाजार मूल्य ४० हजार कोटी रुपये असे ठरविले. आणि २० वर्षांत म्हणजे २००४ ते २०२४ दरम्यान त्या कंपनीचे मोल १४ लाख कोटी रुपये झाले. टाटा उद्योग समूहाच्या हातात नोटा छापण्याचे मशीनच जणू आले. परदेशी कंपन्या खरेदी करण्यासाठी या मशीनचा उपयोग झाला. टाटा सन्सला पैशांची गरज लागली की, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस शेअर्स पुनर्खरेदी योजना जाहीर करते. कंपनीचे प्रवर्तक आपल्याकडील शेअर्स पुनर्खरेदी योजनेत देणार आहेत, असे घोषित केले जाते. त्यानंतर होणाऱ्या या पुनर्खरेदीत टाटा सन्सला पैसा उपलब्ध होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टाटा उद्योग समूहाने चिल्लर उत्पादनातून बाहेर पडावे. मिठापासून ते विमानापर्यंत… कशासाठी वेगवेगळ्या वस्तू उत्पादनाचा हा हट्ट करायचा, अशीसुद्धा टीका टाटा उद्योग समूहावर होते. परंतु आजसुद्धा टाटा उद्योग समूह आणि विश्वास या दोन शब्दांचे नाते कधीही तुटलेले नाही. हीच या उद्योग समूहाची ताकद आणि मौल्यवान शिदोरी आहे.