लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : अमेरिकी अर्थव्यवस्था वाढीच्या लक्षणासह देशांतर्गत आघाडीवर अर्थव्यवस्थेविषयक सकारात्मक आकडेवारीमुळे शुक्रवारच्या सत्रात निर्देशांकांनी १ टक्क्यांची वाढ साधली सेन्सेक्स ७१,००० अंशांचा विक्रमी टप्पा ओलांडत नवीन ऐतिहासिक पातळीला स्पर्श केला. माहिती तंत्रज्ञान, धातू आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने निर्देशांकात नवीन उच्चांकी पातळीवर पोहोचवले.

दिवसअखेर सेन्सेक्सने ९६९.५५ अंशांची म्हणजेच १.३७ टक्क्यांनी उसळी मारून ७१,४८३.७५ या विक्रमी उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात, त्याने १,०९१.५६ अंशांची कमाई करत ७१,६०५.७६ ही सर्वोच्च पातळी गाठली होती. दुसरीकडे निफ्टी २७३.९५ अंशांनी म्हणजेच १.२९ टक्क्यांनी वाढून २१,४५६.६५ या नवीन उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात, त्याने देखील ३०९.६ अंशांची भर घातली आणि २१,४९२.३० या सत्रातील विक्रमी शिखरावर पोहोचला.

अमेरिकी आर्थिक धोरणाच्या सामान्यीकरणामुळे तेथील अर्थव्यवस्था रुळावर येण्याची दिसत असलेली चिन्हे आणि पुढील आर्थिक वर्षात व्याजदर कपातीच्या आशेने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परिणामी बाजारात तेजी टिकून आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेतील मागणी वाढण्याच्या अपेक्षेपेक्षा शुक्रवारच्या सत्रात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांनी उच्चांकी झेप घेतली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेन्सेक्समध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीजचा समभाग ५.५८ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिस, स्टेट बँक, टेक महिंद्रा, टाटा स्टील, एनटीपीसी आणि विप्रो यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. याउलट नेस्ले, भारती एअरटेल, मारुती आणि आयटीसीच्या समभागात मात्र घसरण झाली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारच्या सत्रात ३,५७०.०७ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.

सेन्सेक्स ७१,४८३.७५, +९६९.५५ , (+१.३७)
निफ्टी २१,४५६.६५, +२७३.९५, +१.२९
डॉलर ८३.०३, -२७
तेल ७६.८६. +०.३३