डॉ. आशीष थत्ते

भारतात वित्त क्षेत्र निवडणाऱ्या स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा कमी आहेत आणि त्यातही चांगले यश मिळवणाऱ्या तर अजूनच कमी. यात नैनालाल किडवाई यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. वित्त क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्तेदारी मोडून काढून आपले नाव कमावणाऱ्या किडवाई महिलांच्या आदर्श आहेत. त्यांचे वडील सुंदरलाल यांच्या विमा उद्योगातून प्रेरणा घेऊन त्या वित्त क्षेत्राकडे वळल्या. विशेष म्हणजे त्यांच्या भगिनी एके काळच्या नावाजलेल्या गोल्फपटू; पण नैनालाल यांनी वित्त क्षेत्रच निवडले. भारतात सनदी लेखापाल अर्थात सीएचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर हार्वर्डमध्ये त्यांनी एमबीएचे शिक्षण घेतले. हार्वर्डसारख्या ठिकाणू शिकून पुन्हा भारतात परत येणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. त्यांच्या ज्ञानाची कदर करणाऱ्या कंपन्याच नव्हत्या. त्यांच्या भाषेत सांगायचे तर अगदी सुरुवातीच्या दिवसांत महिलांना त्याच मजल्यावर स्वच्छतागृहाचीदेखील सोय नसायची आणि दोन मजले चढून जावे लागायचे; पण आता परिस्थिती बदलली आहे आणि वित्त क्षेत्रातदेखील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.

मॉर्गन स्टॅन्लेसारख्या नावाजलेल्या संस्थेत काम करताना भारतीय सॉफ्टवेअर आणि दूरसंचार उद्योगाचे महत्त्व ओळखून त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये आर्थिक मदत देऊ केली. विशेषतः जेव्हा कुठलीही भारतीय बँक ही जोखीम घ्यायला तयार नव्हती. त्याच्या मार्गदर्शनाखाली मॉर्गन स्टॅन्ले एके काळची विलीनीकरण हाताळणारी सगळ्यात मोठी बँक होती. सुरुवातीला स्टॅण्डर्ड चार्टर्ड आणि मॉर्गन स्टॅन्लेसारख्या आंतरराष्ट्रीय बँकांमध्ये काम केल्यावर त्या एचएसबीसी बँकेमध्ये दाखल झाल्या आणि त्यांनी बँकिंग क्षेत्रच बदलून टाकले. बँकेच्या भारतातील विस्तारामध्ये किडवाई यांचे मोठे योगदान आहे. आजही त्या एचएसबीसी बँकेच्या संचालक मंडळावर आहेत आणि त्याशिवाय कित्येक कंपन्यांच्या संचालक मंडळांवर त्यांची आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे. महिलांचे सशक्तीकरण हा त्यांचा आवडता विषय आहे. त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत. ‘फॉर्च्युन’, ‘वॉल स्ट्रीट’ आणि ‘टाइम’सारख्या नियतकालिकांनी त्यांची दखल २००२ पासूनच घेतली आहे. भारतातील वित्त क्षेत्रातील महिलांना हे सन्मान फारसे लाभले नसावेत. वित्त क्षेत्रात काम करूनही पद्मश्रीसारखा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या कदाचित वित्त क्षेत्रातील पहिल्या महिला होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.